Amit Ujagare
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा या योजनांचा उद्देश आहे.
या योजनांपैकी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजना आहे, या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी ६००० रुपये आर्थिक मदत प्रदान केली जाते.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत चार महिन्यांच्या अंतरानं प्रत्येकी २००० रुपयांची रक्कम समान तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत.
यानंतर आता २२ व्या हप्त्याची शेतकरी वर्ग वाट पाहात आहे. पण जर लाभार्थी शेतकऱ्यानं आपली ई-केवायसी पूर्ण केलेलं नसेल किंवा त्यांचा मोबाईल क्रमांक जर अपडेट नसेल तर हा हप्ता अडकू शकतो.
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी खात्यात जमा झाला होता. त्यामुळं आता पुढचा २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
यासाठी ईकेवायसी कशी अपडेट करायची पाहुयात. pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च बटनावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओटीपी क्रमांक तिथं टाईप करा.
त्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पीएम किसान योनजेसाठी तुमची ई-केवायसी होऊन जाईल. त्याचा तुम्हाला मेसेजही येईल आणि विनाअडथळा २२ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.