Amit Ujagare
नव्या बारकोडच्या अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्थात डोमेसाईलसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरु आहे.
'आपलं सरकार' केंद्रांवर ही लूट सुरु आहे. जुने प्रमाणपत्र असतानाही ते अपडेट करण्याची सुविधा नसल्यानं पुन्हा नव्यानं सर्व कागत्रांसह डोमेसाईल काढावं लागत आहेत.
नव्या बारकोडच्या डोमेसाईलसाठी तहसीलदारांचा पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशन कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.
पण जर नव्या ठिकाणी राहायला आलेल्या एखाद्या व्यक्तीला डोमेसाईल काढायचं असेल तर सहाजिकच त्याला रहिवासी दाखला मिळू शकत नाही. त्यामुळं पंधरा वर्षांच्या एखाद्या रहिवाशाचं अॅफिडेव्हिट करुन २,००० ते ४,००० रुपये इतकी फी आकारुन नवे प्रमाणपत्र दिले जात आहेत.
डोमेसाईलसह वय आणि नागरिकत्वाचं प्रमाणपत्र एकत्रच दिलं जातं. पण अनेक वर्षांपूर्वीच हे प्रमाणपत्र काढलेलं असतानाही तेच बारकोडसह अपडेट करुन मिळत नाही.
पासपोर्ट, म्हाडाची लॉटरी, नोकरीसाठी, तसंच स्कॉलरशीप डीबीटी योजनेसाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यानं जुनं प्रमाणपत्र असतानाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केवळ बारकोड असलेलं डोमेसाईल अपलोड केल्यावरच म्हाडाचे अर्ज भरता येतात अन्यथा फॉर्मच सुरु होत नाही. त्यामुळं स्वप्नातलं घर घेण्यासाठी हा मोठा अडथळा ठरला आहे.
ज्या नागरिकांकडं तहसलीदारांच्या सही शिक्क्यांची ओरिजनल जुनी डोमेसाईल प्रमाणपत्रे आहेत तीच केवळ बारकोडसह अपडेट करुन ऑनलाईन डाऊनलोडसाठी उपलब्ध करावीत अशी मागणी नागरिकांकडून होतं आहे.