Deepak Kulkarni
राजस्थानमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत हे आता काही लपून राहिलेले नाही.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक अशी सचिन पायलट यांची ओळख आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून बघितलं जात होतं.
2018 साली राजस्थानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेस सत्तेत आली. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
अखेर काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाची माळ घातली ती ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या गळ्यात. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आणि राज्यात नाराजीनाट्याला सुरुवात झाली.
2018 ते जुलै 2020 पर्यंत सरकार सुरळीत होतं.पण, जुलै 2020 मध्ये सचिन पायलट यांनी बंड केलं.
अशोक गहलोत यांच्या राजकीय चातुर्यामुळे पायलट बंड मोडीत निघालं. याच बंडामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं.
अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून हा त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.
तेव्हापासून आजपर्यंत अनेकवेळा पायलट यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरलं आणि आता तर थेट सरकारविरोधात उपोषणाचीच घोषणा केली.
2018 नंतर राजस्थानमध्ये सरकार स्थापन झाल्यापासून गेहलोत - पायलट यांचा पक्षातील दोन सत्ताकेंद्रांशी असलेला संघर्ष वारंवार समोर येत आहे.
राजस्थानमध्ये याचवर्षी विधानसभेची निवडणूक होईल. जर काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर राज्यातल्याच दोन प्रमुख नेत्यांमध्ये असाच संघर्षावर तोडगा काढावा लागणार आहे.