Amit Ujagare
पुणे जिल्ह्यातल्या शिरुरच्या कारेगावच्या रहिवासी, गावच्या माजी सरपंच तसंच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा असलेल्या निर्मला शुभम नवले यांचा नुकताच पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला.
पराभूत झालेल्या असतानाही त्यांची सध्या खूपच चर्चा होत आहे, कारण सोशल मीडियात त्या प्रचंड फेमस आहेत. उच्च शिक्षित तरुण महिला तसंच स्टायलिश लूकमुळं त्यांना इन्स्टास्टार म्हणून ओळखलं जातं. सिनेमातील हिरोईनलाही टक्कर देतील अशी त्यांची सोशल मीडियात इमेज असल्यानं त्या इन्फ्लुएन्सर म्हणूनही ओळखल्या जातात.
राजकारणी असल्या तरी आपल्या खास शैलीतील सोशल मीडियावरील वावर असल्यानं त्यांचे महाराष्ट्रभरात फॉलोवर्स आहेत. राजकारण करत असताना विकास कामांचा आढावा त्या रिल्सच्या माध्यमातून घेताना दिसतात.
यंदा त्यांनी पंचायत समितीसाठी कारेगाव-कान्हुर मेसाई गणातून निवडणूक लढवली होती. सभांना मोठी गर्दी, सोशल मीडियातून हायटेक प्रचार अन् तब्बल ६ लाखांच्या जवळपास फॉलोवर्सच्या जोरावर निर्मला नवलेंची हवा असल्याची चर्चा होती.
"आय वॉन्ट इट मिन्स आय वॉन्ट इट" सारखा व्हायरल व्हिडिओमुळं चर्चेत, तसंच रेंज रोव्हर कारच्या व्हिडिओमुळं 'हाय-प्रोफाइल' किंवा 'इन्स्टास्टार सरपंच' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सोशल मीडियातील कायम चर्चेत असलेला हा चेहरा असतानाही त्यांचा पराभव झाला, यामागे काही महत्वाची निरिक्षणे आहेत.
ग्रामीण मतदारांना मूलभूत समस्या (पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज, रोजगार) जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं हायप्रोफाईल लाईफस्टाईल असलेला नेता सहाजिकच सर्वसामान्य ग्रामीण जनतेला हे रुचणारा आणि पचणारा नाही.
निर्मला नवले यांचा भाजपच्या मनिषा पाचंगे यांनी २,७०० मतांनी पराभव केला. भाजपसारख्या बड्या पक्षाच्या ताकदीपुढं आणि नियोजनबद्ध रणनीतीपुढं त्यांची इन्स्टास्टारची इमेजही फिकी पडल्याचं चित्र आहे.
भाजपने बूथ लेव्हलवर प्रभावी यंत्रणा उभी केली होती. स्थानिक मुद्द्यांवर थेट संवाद आणि नियोजित प्रचार केला. तर नवले यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तरी अपेक्षित संघटनात्मक ताकद त्यांच्या मागे नव्हती, असंही सांगितलं जात आहे.