Amit Ujagare
सोशल मीडियात आणि मुख्य मीडियातही सध्या 'कॉकरोच जनता पार्टी' नावाच्या चळवळीची चर्चा सुरु आहे. भारतभरात या नव्या कथित राजकीय पार्टीनं खळबळ उडवून दिली आहे.
१५ मे २०२६ रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे 'कॉकरोच' आणि 'परजीवी' अशी केल्यामुळं मोठ वादंग निर्माण झालं होतं.
तरुणांचा अपमान करणाऱ्या या विधानाचा निषेध म्हणून अभिजित दिपके या मराठी तरुणानं यावर उपरोधात्मक (Satire) टीका करत 'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना केली.
अशा राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर त्यानं आपल्या पार्टीचा जाहिरनामा देखील प्रसिद्ध केला. यामध्ये महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा, गांधी-नेहरु-आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष-लोकशाही विचारधारा, युवा शक्ती नवा पर्याय, सबका साथ-सबका विकास यांचा समावेश आहे.
पण हा पक्ष स्थापन करणारा अभिजीत दिपके नेमका कोण आहे? त्याचं शिक्षण काय? त्यानं कुठे काम केलंय? जाणून घेऊयात.
अभिजीत दिपके हा मुळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी. त्याचं वय ३० वर्षे, त्यानं पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षणही घेतलं. त्यानंतर उच्चशिक्षण अमेरिकेत बोस्टन विद्यापीठातून केलं तिथं त्यानं 'पब्लिक रिलेशन्स'मध्ये मास्टर्स केलं.
डिजिटल राजकीय रणनीतीकार म्हणून त्यानं करिअरला सुरुवात केली. २०२०-२०२२ या काळात त्यानं आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियाचा टीमसोबत काम सुरु केलं.
तरुणांना आकर्षित करणारा कंटेन्ट तयार करण हे त्याचं प्रमुख काम होतं. त्यानं केजरीवाल सरकारच्या शिक्षण विभागात कम्युनिकेशन अॅडव्हायझर म्हणूनही काम केलं आहे.