Amit Ujagare
सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात भोंदूगिरीविरोधात भूमिका मांडणारे कृष्णा चांदगुडे यांचं नाव सातत्यानं येत आहे.
या कृष्णा चांदगुडे यांनी खरात प्रकरणात पोलीस तपासात महत्वाची भूमिका बजावली आहे, पण ते नेमके कोण आहेत? त्यांनी खरात प्रकरणं इतकं लावून का धरलं? जाणून घेऊयात.
खरात प्रकरणात अंनिसकडून सक्रिय पाठपुरावा करण्यात आला. या स्वयंघोषित भोंदूबाबाविरोधात अंधश्रद्धा आणि त्यातून महिलांचं शोषण केल्याप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट तसंच एसआयटी प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन या प्रकरणातील गोपनीय माहिती, संपर्क क्रमांक आणि संभाव्य साक्षीदारांची माहिती दिली.
खरात भोंदूगिरी करत कोल्ह्याच्या नसलेल्या शिंगांची पुजा करणे, उच्चभ्रूंना हरणाची कस्तुरी असे दिशाभूल करणारे प्रकार करत होता, त्यामुळं त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गतही चौकशी करण्याची मागणी चांदगुडे यांनी लावून धरली होती.
पूर्वी खरातच्या कार्यक्रमांना विरोध केल्याबद्दल अंनिस कार्यकर्त्यांवर पिस्तूल रोखण्यात आल्याचा आणि मंत्र्यांच्या ओएसडींकडून धमक्या आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यामुळं तपासावर कोणताही दबाव पडू नये, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
कृष्णा चांदगुडे हे नाशिक येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते आहेत. जात पंचायत मूठमाती अभियानाचे ते राज्य कार्यवाह आहेत. त्यांच्या पुढाकाराने 'सामाजिक बहिष्कार विरोधी' कायदा संमत झाला आहे.
अंनिसच्या माध्यमातून ते अंधश्रद्धा निर्मूलन, भोंदूबाबांविरोधी कारवाया, आंतरजातीय विवाहांना पाठिंबा आणि जातपंचायतीच्या विरोधात ते लढा देत आहेत.
सामाजिक अन्याय, विधवा प्रथा निर्मूलन आणि अंधश्रद्धेच्या बळींबद्दल ते सातत्यानं आवाज उठवत असतात.