Rashmi Mane
लोकसभेत आज अविश्वास ठरावावर मतदान पार पडत आहे. मतदानाआधी विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदींवर जोरदार तोफ डागली आहे.
" मागील तीन महिन्यांत सहा हजार पाचशे 'एफआयआर' मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. चार हजार घरे उद्ध्वस्त झाली, साठ हजार लोक बेघर झाले, असा प्रकार कोणत्याही राज्याने पाहिला नाही", असे महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत सांगितले.
मोदींवर जोरदार तोफ डागणाऱ्या महुआ मोईत्रा कोण आहेत जाणून घेऊया.
आसाममध्ये जन्मलेल्या मोईत्रा यांनी प्राथमिक शिक्षण कोलकात्यात पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. मॅसेच्युसेट्समधील माउंट होल्योक कॉलेजमधून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मोईत्रा यांनी 'जेपी मॉर्गन' या कंपनीमध्ये काम केले आहे. एक गुंतवणूक तज्ञ म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. 2008 मध्ये, मोईत्रा यांनी नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मोईत्रा यांनी 2009 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत, आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मोईत्रा याआधी राहुल गांधींच्या 'आम आदमी के शिपाही' प्रकल्पाच्या प्रमुख सदस्य होत्या. मात्र, त्या काँग्रेससोबत जास्त काळ राहिल्या नाहीत.
मोईत्रा वर्षभरानंतर काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या. 'टीएमसी'ने त्यांना 2016 मध्ये करीमपूर विधानसभेचे तिकीट दिले आणि त्या जिंकल्या.
2019 मध्ये 'टीएमसी'च्या अध्यक्षा ममतांनी त्यांना कृष्णानगर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. मोईत्रा ममताच्या अपेक्षांवर खऱ्या उतरल्या आणि पहिल्यांदाच संसदेत पोहोचल्या.
पहिल्याच भाषणात NRC च्या मुद्द्यावरून संसदेत सरकारवर हल्लाबोल करत मोईत्रा प्रसिद्धी झोतात आल्या. मोईत्रा नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर परखडपणे मत माडतांना दिसतात.