Amit Ujagare
सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते, ते काँग्रेसचे एक महत्वाचे नेते होते.
महात्मा गांधींसोबत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं.
स्वतंत्र्याच्या लढाईत लोकांची एकजूट करण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. गृहमंत्री असल्यानं स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानं खालसा करुन ती स्वतंत्र भारतात विलीन करुन घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं.
हे आव्हान पेलताना त्यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतरही स्वतंत्र असलेली हैदराबाद, जुनागड, काश्मीर यांसारखी एकूण ५६२ छोटीमोठी संस्थानं एकत्र जोडून अखंड भारत बनवला. त्यामुळं त्यांना देशाचे 'लोहपुरुष' ही उपाधी मिळाली.
त्यांनी कामगार, शेतकऱ्यांसाठी देखील आंदोलनं केली. अहमदाबाद शेतकरी आंदोलन आणि १९२८ मधील बारडोली सत्याग्रहाचं त्यांनी यशस्वी नेतृत्व केलं. इथेच शेतकऱ्यांनी त्यांना 'सरदार' ही उपाधी दिली.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी झाला होता. त्यामुळं आज त्यांची १५० वी जयंती आहे. या निमित्त केंद्र सरकारनं त्यांचा जन्म दिवस हा 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे.
या निमित्त देशभरात 'रन ऑफ युनिटी' नावाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं जातं.
आपल्या देशाचं स्वातंत्र्य आबाधित राखण्यासाठी आपल्याला तेवढीचं मेहनत करावी लागेल जेवढी मेहनत आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली होती, हा त्यांचा विचार आजही लागू होतो.