

Nanded News : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड पुकारले होते. त्यावेळी शिंदे समर्थकांसह सुरत व्हाया गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. या गुवाहाटी दौऱ्यावेळीचे अनेक किस्से राजकारणात आजही चर्चेत आहेत. या दौऱ्याप्रसंगी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’, हा डॉयलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. आता त्यामध्ये नांदेडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अजून एका किस्स्याची भरच घातली आहे.
नांदेड येथे पार पडलेल्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना परत एकदा गुवाहाटीतील घटनाक्रम आठवला. त्यावेळी आलेला हा अनुभव त्यांनी कार्यक्रमास उपस्थितांसमोर मांडला. शिरसाट म्हणाले, 'गेल्या 42 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून ही तिसरी बंडखोरी होती. पण आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे तणावात होते अन भीतीपोटी व्याकुळ झालेल्या कल्याणकर यांनी जेवणही सोडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती. आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल? ही चिंता त्यांना सतावत होती.दुसरीकडे आम्ही आमदारांची संख्या मोजत होतो.'
कल्याणकर मात्र, त्याठिकाणी सतत तणावाखाली वावरत होते. बालाजी त्याठिकाणी वेळेवर जेवतही नव्हता. एकदा तर म्हणाला, 'मी आता हॉटेलवरून उडीच मारतो.' आम्हाला एका एका आमदाराची जुळवाजुळव करावी लागत होती. एखादा आमदार कमी पडला तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती. त्यामुळेच आम्ही बालाजी कल्याणकर यांच्यासोबत दोन माणसे नेहमीच ठेवली होती, असा गौप्यस्फोट यावेळी शिरसाट यांनी केला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीला निधी दिल्याबद्दल संजय शिरसाठ यांचा नांदेडमध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंत्री संजय शिरसाठ यांनी बंडखोरी संदर्भातील किस्सा सांगितला, यावेळी त्यांनी नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या संदर्भात हा मोठा गौप्यस्फोट केला.
ठेच लागल्याशिवाय राजकारण कळत नाही
त्याचवेळी संजय शिरसाट यांनी कल्याणकर यांनी केलेल्या धाडसाचे तोंडभरून कौतुक केले. हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आज कल्याणकरने जे काम केले त्याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, पाच आमदार झाले असतील मतदारसंघात जास्त काम केले का नाही. आमच्यापेक्षा हुशार कल्याणकर हाच निघाला सगळ्यात जास्त निधी त्यांनाच घेतला अन दुसऱ्यांदा निवडून देखील आला, असा टोला शिरसाटांनी लगावताच सभागृहात हास्यकल्लोळ पसरला. सार्वजनिक जीवनामध्ये ठेच लागल्याशिवाय राजकारण कळत नाही. तुम्हाला ठेच लागत नाही, तोपर्यंत त्रास कळत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.