
Solapur News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयावर भाष्य केलं आहे. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे. त्यानुसार देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे असं विधान पवार यांनी केलं आहे. यावर भाजपकडून बोचरी टीका करण्यात आली आहे.
राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले, रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे भरपूर आहेत. शरद पवारांनी पोपट घेऊन बसणाऱ्याच्या रांगेत बसू नये', असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीमध्ये स्वप्नरंजन सुरू आहे. हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
हे विरोधी पक्षाचे कामच आहे...
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही. गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपयादेखील दिला नाही. उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या. ‘एनडीआरएफ’च्या निकषापेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला.
राज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे. जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. सरकार आल्यापासून १२ हजार कोटी रूपये मागील सात महिन्यांत शेतकऱ्यांना दिले आहेत. कांद्याच्या दरावरून महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत विखे पाटील म्हणाले की, शेवटी विरोधी पक्षाचे काम आहे की, प्रश्नाचे राजकारण करणे असंही राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishana Vikhe Patil) यावेळी म्हणाले.
अहिल्यादेवी नाव नगरला देणं हे भूषणावहच...
नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच नगर जिल्हा विभाजनाच्या बाबतीत देखील प्रस्ताव आहेत. जे जे मोठे जिल्हे आहेत, त्याबाबत राज्य सरकार एकत्रितपणे निर्णय घेईल.नगर जिल्ह्याचे नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे असा प्रस्ताव आहे त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव नगर जिल्ह्यात आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला देणे, हे भूषणावहच आहे असं विखे पाटील यांनी सांगितले.
'' शेतकऱ्यांच्या बाबतीत स्टंटबाजी करू नये..''
कांदा उत्पादक शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी काही शेतकऱ्यांना घेऊन सोलापुरातील नियोजन भवन येथे गोंधळ घातला. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'शेतकऱ्यांची जाणीव आहे. विधानसभेत देखील यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या बाबतीत राजकारण करू नये किंवा स्टंटबाजी करू नये. उद्या सकाळी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांसोबत चर्चा करू' असं विखे पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.