
Manikrao Kokate controversy : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील कथित जंगली रम्मी गेम खेळण्याच्या व्हिडिओवरून सुरू असलेला वाद आता राज्यभरात अधिकच चिघळला आहे. नाशिकमध्येही त्याचे पडसाद दिसून आले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या कृतीचा निषेध म्हणून रस्त्यावर रमी खेळत धिक्कार केला.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा विधानभवनात अधिवेशन सुरु असताना रम्मी गेम खेळतानाचा व्हिडीओ ट्विट केला. तेव्हापासून कोकाटे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषीमंत्री सभागृहात गेम कसे खेळू शकतात? असा सवाल करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यावर मंगळवारी सकाळी पत्रकारपरिषद घेत कोकाटेंनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. आपण रमी खेळलो नाही, रम्मी आपल्याला खेळता येत नाही. आपल्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून ज्यांनी आपली बदनामी केली त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला.
परंतु तरीही कोकाटे यांच्याविरोधातील विरोधकांचा राग काही कमी झालेला दिसत नाही. उलट तो अधिक वाढल्याचे चित्र आहे. नाशिकच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. २२) कॉंग्रेस भवन समोर रस्त्यावर आंदोलन करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोकाटे यांचा निषेध म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच रमीचा डाव मांडला.
जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर कोकाटे यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली. यादरम्यान महायुती सरकारमधील मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेश पोकळे, उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस समाधान बागुल, युवक काँग्रेसचे सचिव सदाशिव गणगे, देवेन मारु, राजकुमार जेफ, करण खरे, मतीन पटेल, निखिल शिंदे, शक्ती शर्मा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील शेतकरी संकटात आहे, अशा परिस्थिती कृषिमंत्र्यांनी जबाबदारीने विधानं करायचे असतात. जबाबदारीने निर्णय घ्यायचे असतात. पण राज्याचे कृषीमंत्री विधानभवनात ऑनलाइन रमीचा गेम खेळतात. तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांना ऑनलाइन गेम खेळून आयुष्य नष्ट करण्यासाठी ते प्रेरित करत असल्याचा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. कृषी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
तर दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेतेही कोकाटे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक भैय्या मणियार, योगेश देशमुख आणि निलेश शिरसाठ यांसह विविध कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर पत्ते फेकले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.