
Mumbai News : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (दि.९) विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री फडणवीसांनी या अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या आहेत. याचवेळी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर या महानुभाव पंथाच्या प्रमुख केंद्राच्या ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मराठी विद्यापीठ स्थापनेचा पहिला ठरावच ८५ वर्षांपूर्वी नागपूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाला होता. मराठी भाषाप्रेमींचं स्वप्नं फडणवीस यांनी पूर्ण केलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावपंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी म्हणून ओळखली जाते. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले. त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहिले गेल्यानं या भूमीला विशेष महत्व आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
नागपुरमध्ये १९३४ मध्ये कृ. प्र. खाडिलकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेचा ठराव मांडला होता. विशेष म्हणजे साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने मराठी विद्यापीठ स्थापनेची शिफारस केली होती.
चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या भाषा सल्लागार समितीने एक फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांनी स्थापनेचा ठराव केला होता. मात्र, तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने त्यावर कार्यवाही केली नाही.
मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.