Pimpri Chinchwad News : लोकसभेला महाराष्ट्रात जोरका झटका...बसल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने लगेचच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. त्याव्दारे निम्मा मतदार असलेल्या महिलावर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी करण्यात आला आहे.
मात्र, ही योजनाही वादात सापडली. त्यामुळे ती हात देईल की नाही या भीतीतून त्यांनी (खरं,तर भाजपने) आता हिंदू मतांच्या धुव्रीकरणाची आपली जुनी खेळी नव्याने खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी देशीगायीला सोमवारी (ता.30) गोमाता,राज्यमाता घोषित केले.
विधानसभा निवडणूक राज्यात येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.त्या तोंडावर लाडक्या बहीणनंतर आता गोमाता-राज्यमाता हे नवे अस्त्र भाजप तथा महायुतीने (Mahayuti) बाहेर काढले आहे. हिंदु मतांचे ध्रुवीकरण करण्याची चाल त्यामागे आहे.
पण बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरने जसे काही प्रश्न उभे केले, तसे या गोमाता योजनेतून निर्माण झाले आहेत. अडीच वर्षे सत्तेत असलेल्या युती सरकारला आताच ही योजना जाहीर करण्याचा मुहूर्त कसा मिळाला,हा पहिला प्रश्न यानिमित्ताने मनात येतो आहे. दुसरं म्हणजे गाय ही गायच असते. मग,ती देशी असो की जर्सी? (ती विदेशी ब्रीड)
दुसरं म्हणजे देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्याने गो हत्या आणि कत्तलखाने बंद होणार आहेत का, बीफ निर्यात थांबणार आहे का,गायांना हक्काची जागा (गायरान) मिळणार आहे का,गोवंश नर म्हणजे खोंड तथा बैलाची हत्या थांबणार आहे का असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान,हिंदू मते आकर्षित करण्यासाठीच ही योजना आणल्याचा दावा शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगेच केला.
लोकसभेनंतर विधानसभेसाठी महायुतीने केलेल्या विविध सर्व्हेमध्ये त्यांचे स्थान डळमळीत राहील,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यातूनच लाडकी बहिण कितपत हात देतील याची खात्री नसल्याने महायुतीने त्यातही भाजप आणि शिंदे शिवसेनेने गोमाता हे कार्ड आता खेळले आहे. या योजनेतून त्यांनी खुलेपणे हिंदू मते खेचण्याची खेळी केली आहे. त्याजोडीने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
भाजपला हिंदू मतांचे धुव्रीकरण यातून करायचे आहे.तर, खरी शिवसेना आपणच आहे हे सांगून यातून आपणच खरे कसे हिंदुत्ववादी आहोत,हे शिंदे शिवसेनेला ठाकरे शिवसेनेला दाखवून द्यायचे आहे. कारण लोकसभेला ठाकरे शिवसेनेची कामगिरी शिंदे शिवसेनेपेक्षा सरस राहिली आहे.
एकूणच पुन्हा सत्तेत येण्यासाठी,सत्ता राखण्याकरिता महायुती खटपटी करत आहे.त्याकरिता ४८ हजार कोटी रुपये खर्चाची लाडकी बहीण योजना आणली. त्यावर खुद्द केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीच घरचा आहेर नुकताच दिला. तरी राज्य शासनाचे डोळे उघडत नाहीत. मग,सलाईनवर गेल्यावर ते जागे होणार का,अशी विचारणा आता केली जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.