Walchandnagar News : उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या कामाचा डंका जगामध्ये वाजला आहे. अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झाले होते. देशामध्ये पर्यायी नेतृत्व तयार होऊ शकते, याची भीती वाटल्याने त्यांनी शिवसेना पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर यांनी केला. (....So BJP broke Shiv Sena : Sachin Ahir told the reason)
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात अहिर यांनी शिवसेनेच्या फुटीबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, भाजपची हुकूमशाहीप्रमाणे सुरू असलेली राजवट उलथवून टाकण्यासाठी देशात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यांच्या माध्यमातून देशाला पर्यायी शक्ती, नेतृत्व मिळू शकेल, अशी भीती मोदी सरकारला वाटत असल्यानेच त्यांनी ‘इंडिया’चे नावच बदलण्याचा घाट घातला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात आम्ही अनेक हाताला काम देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे सरकार जाताच रोजगारनिर्मितीचे मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. मात्र, हिंदुत्वादी असूनही मुँह में राम आणि हाथों को काम असे आमचे धोरण आहे, असेही सचिन अहिर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, केंद्रातील सरकारला महागाईवर साधी चर्चाही करायची नाही. कारण निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांनी आता गॅस सिलिंडचे दर कमी केले आहेत. पण, निवडणुका संपताच सिलिंडचे दर पुन्हा वाढविले जाऊ शकतात. आपल्या देशाला वेगळ्या दिशेने नेण्याचे कामही सरकारकडून केले जात आहे.
शिवसेनेची इंदापूर तालुक्यात ताकद आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेला संघर्ष ध्यानात ठेवा. आपला नेता लढत असताना आपणही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. विशेषतः पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन काम करायला हवे. इंदापूर तालुक्यात शिवसेना निश्चितपणे वाढेल. विधानसभा लढविण्यासाठी तुम्ही उमेदवार तयार करा. जिंकण्यासाठीच आपल्याला विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, हरण्यासाठी नाही, असे सांगून इंदापूरची जागा लढविण्याचे संकेतही सचिन अहिर यांनी दिले.
या वेळी जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, राजेंद्र काळे, भीमराव भोसले, संजय काळे, नितीन शिंदे, सुदर्शन रणवरे, दीपक खरात, नितीन कदम, मंदार डोंबाळे, विजय शिरसट यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.