फडणवीसांच्या त्या ‘जीआर’ची आठवण करून देत भालके समर्थकांनी उडवली परिचारकांची खिल्ली!

फडणवीसांनी काढलेला आदेश त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना आता अडचणीचा ठरू लागल्याची चर्चादेखील या निमित्ताने सुरू झाली आहे.
Bhalke supporters mocked the meeting held by MLA Prashant Paricharak :
Bhalke supporters mocked the meeting held by MLA Prashant Paricharak :

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा नगरपालिकेच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला नगराध्यक्ष, पक्षनेते, काही नगरसेवक व मुख्याधिकारी अनुपस्थित राहिले होते. त्यावरून बैठकीतच नाराजी व्यक्त करत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे सूतोवाच केले होते.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला अध्यादेशाची आठवण करून देऊन भालके समर्थकांनी आवताडे आणि परिचारक यांनी घेतलेल्या बैठकीची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे  फडणवीसांनी काढलेला आदेश त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना आता अडचणीचा ठरू लागल्याची चर्चादेखील या निमित्ताने सुरू झाली आहे. (Bhalke supporters mocked the meeting held by MLA Prashant Paricharak) 

आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून नगरपालिकेतील नगरसेवकांनी त्यांना भाजप सरकारच्या कालावधीत विकास निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर आमदार परिचारक  व नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहराच्या विकास कामाच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती.

आमदार समाधान आवताडे हे नवखे असल्यामुळे ही आढावा बैठक सर्वस्वी आमदार परिचारक यांनीच हाताळली. त्यामध्ये त्यांच्या काळात त्यांनी विकास कामासाठी मिळवून दिलेल्या निधीच्या संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र, अधिकाऱ्यांकडून माहिती न मिळाल्यामुळे आमदार प्रशांत परिचारक हे संतप्त झाले. त्यांनी प्रथम कर्मचारी आणि त्यानंतर मुख्याधिकऱ्यांवर आपला राग काढत या संदर्भात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याचे सूतोवाचदेखील  केले. 

दरम्यान, मंगळवेढा नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना संकटात घेतलेल्या आढावा बैठकीबाबत सरकारच्या निर्देशाचे पालन केले नसल्याचा  आरोप केला आहे. या प्रकारानंतर आज (ता. ३ जून) भालके समर्थकांनी या आमदार परिचारक यांनी घेतलेल्या बैठकीबाबत सोशल मीडियातून आक्षेप नोंदवला आहे. ता. 11 मार्च 2016 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या आदेशानुसार संसद व विधिमंडळ सदस्य अन्य प्रशासकीय सदस्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना किंवा आदेश देता येणार नाही. अशा बैठकांना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक नाही. 

फडणवीस सरकारने काढलेल्या त्या अध्यादेशाच्या बातमीचे कात्रण सोशल मीडियात टाकून आमदार परिचारकांनी बैठकीत दिलेल्या सूचनांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आदेशात बदल केला की नाही याची चर्चा रंगली. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आमदार परिचारक व भालके समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचे काम कायम असल्याचे दिसून येते.

पंढरीच्या दोन नेत्यांच्या समर्थकांतील आरोप-प्रत्यारोपांमध्ये मंगळवेढा शहर व तालुक्याच्या विकासाला खीळ बसते की काय याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com