भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की; आमदार भारसाकळेंची शिवसेना नेत्यांशी बाचाबाची

यावेळी तुमचेच सरकार अडवणूक करत असून बाळापूर तालुक्यातील दिंडी मार्गाचीसुद्धा अशीच परिस्थिती असल्याचे आमदार भारसाकळे म्हणाले.
Dispute between BJP-NCP workers in Akola
Dispute between BJP-NCP workers in Akola

अकोला : तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्यांची स्थिती अतिशय दयनिय झाली आहे. त्यामुळे याविषयी नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी (ता. १२ ऑगस्ट) दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक संपत असतानाच तेल्हारा तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रत्यांमध्ये जोरदार शाब्दीक वाद झाले व त्यांचे रुपांतर नंतर धक्काबुक्कीमध्ये झाले. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. (Dispute between BJP-NCP workers in Akola)

हा प्रकार घडला, त्यावेळी सभागृहात भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या हॅम प्रकल्प योजनेंतर्गत तीन रस्ते मंजूर झाले आहेत. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील निमकर्द-पारस दिंडी मार्ग, तेल्हारा तालुक्यातील अडसूळ ते हिवरखेड आणि वरवट बकाल ते वणीवरूळा या मार्गाचा समावेश आहे. हे रस्ते गत अडीच वर्षांपासून खोदण्यात आले आहेत. परंतु बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना रस्त्याने जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

तेल्हारा तालुक्यातील या मुख्य रस्त्यांबाबत अनेकदा आंदोलन, उपोषण करण्यात आले. या मार्गाचे काम अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना या भागातील नागरिकांमधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच तेल्हारा येथे विविध कामांच्या भूमिपूजनाकरिता आलेल्या आमदार भारसाकळे यांना विरोध करत गोंधळ घातला होता. लोकांचा संताप बघता आमदार भारसाकळे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रस्त्यांचे काम कसे तात्काळ मार्गी लागणार याबाबत गुरुवारी (ता. १२) बैठक आयोजित केली होती. 

बैठकीत तेल्हारा व अकोट तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील ठराविक कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेत पार पडली. मात्र, बैठकीच्या शेवटी आमदार भारसाकळे यांनी बाळापूरसह संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याचे म्हणताच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व आमदार भारसाकळे यांच्यात शाब्दीक वाद झाला. या वेळी आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे माजी सभापती पुंडलिक अरबट, राष्ट्रवादीचे तेल्हारा तालुकाध्यक्ष प्रदीप ढोले उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

बैठकीत सुरुवातीला सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनीसुद्धा याबाबत मत मांडले. परंतु बैठकीच्या शेवटी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी या कामांना एवढा उशीर का लागला? असा प्रश्न उपस्थित केला. यावर यावेळी तुमचेच सरकार अडवणूक करत असून बाळापूर तालुक्यातील दिंडी मार्गाचीसुद्धा अशीच परिस्थिती असल्याचे आमदार भारसाकळे म्हणाले. यावरून संजय अढाऊ यांचे आमदारांसोबत खटके उडाले. तेव्हा अकोट येथील काही भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com