पडळकरांना धनगर आरक्षण लढ्यातून हाकलणारे 'ते' कार्यकर्ते कोण?

उत्तम जानकर- पडळकर यांचे पक्ष वेगवेगळे झाले तरी दोघांच्या चांगला समन्वय होता. मात्र चार दिवसांपुर्वी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे दोन्ही नेते विभागल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
rift between uttam jankar and gopichand padalkar
rift between uttam jankar and gopichand padalkar

माळशिरस (सोलापूर): भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धनगर आरक्षण लढ्यातून बेदखल करत त्यांच्यावर बहिष्कार घातल्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी काल जाहीर केले. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतल्याचे जानकर यांनी म्हटले केले आहे, मात्र त्या कार्यकर्त्यांची नावे काही जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे ते कार्यकर्ते कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

उत्तम जानकर- गोपीचंद पडळकर यांनी 'धनगर आरक्षण: अखेरचा लढा' हे आंदोलन जून 2018 मध्ये सुरू केले होते. ते लोकसभा निवडणुका जाहीर होइपर्यत चालले. यादरम्यान त्यांना ठिकठिकाणी हेलिकॉप्टर दौरे करून सभा घेतल्या होत्या. आरक्षण विषयावर आधारित एक शॉर्ट फिल्म तयार केली होती. तसेच या आंदोलनादरम्यान दोघांचा धुमस या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. महत्वाच्या राजकीय बैठका हे दोघेच करत होते. लोकसभेवेळी शिवसेना- भाजप नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या होत्या. भाजपने दोघांना तिकीटे द्यावीत, असा प्रयत्न त्यांनी केला होता. तिकीटे मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर उत्तम जानकर यांनी माढ्यात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला तर पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून सांगली लोकसभेचे तिकीट घेतले. उत्तम जानकर माढ्यात भाजपचे काम करत असताना सांगलीत भाजपच्या विरोधात पडळकरांच्या प्रचारासाठी गेले होते. विधानसभेला पडळकरांना बारामतीतून तर उत्तम जानकर यांना फलटणमून लढण्याची ऑफर भाजपने दिली होती, मात्र उत्तम जानकरांना माळशिरसचे तिकीट हवे होते. मात्र ते मिळाले नाही. त्यामुळे उत्तम जानकरांनी राष्ट्रवादीचे तिकीट घेवून लाखाच्यावर मते मिळवली. अवघ्या दोन अडीच हजारात त्यांचा विजय हुकला. पडळकर बारामतीची ऑफर स्विकारून तिकडे गेले. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले मात्र काही दिवसांपुर्वीच ते विधान परिषदेवर आमदार झाले. यादरम्यान उत्तम जानकर- पडळकर यांचे पक्ष वेगवेगळे झाले तरी दोघांच्या चांगला समन्वय होता. मात्र चार दिवसांपुर्वी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे दोन्ही नेते विभागल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

भाजपचा एजेंडा पुढे रेटण्यासाठी पडळकरांनी चार दिवसांपुर्वी शरद पवारांवर वादग्रस्त टीका केली. त्यावर उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीची भुमिका म्हणून पडळकरांचा निषेध केला. फडणवीसांना आपण भामटा म्हणू शकतो, असा इशारा देत मोदी- फडणवीसांनी धनगर समाजाशी बेईमानी केल्याचा आरोपही केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बैठक घेत पडळकरांना आरक्षण समितीतून बेदखल केले आहे. 'पडळकर यांनी बेताल वक्तव्य करून धनगर समाजाची मानहाणी केली. दोन समाजात तेड निर्माण करून शांतता भंग केली. त्यामुळे समाजाच्या आरक्षणाचा मुळ प्रश्न बाजूला गेला आहे. परिणामी पडळकर यांना यापुढे आरक्षण लढयात कुठेही सहभागी करून घेतले जाणार नाही', असे जानकर यांनी जाहीर केले. मात्र बैठकीला उपस्थित असणारांची नावे त्यांनी जाहीर केलेली नाहीत. या आरक्षण लढ्यासंबंधाने पुढील काळात वादंग माजण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com