
J.P. Nadda Latest News : भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपत आहे. 20 जानेवारी 2020 रोजी नड्डा यांनी पक्षाचे पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर जुलै 2019 मध्ये नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. पण आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा स्थितीत नव्या अध्यक्षाबाबत भाजपमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचे वर्णन भाजपच्या (BJP) घटनेच्या कलम 19 मध्ये करण्यात आले आहे. यानुसार पक्षाच्या राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदेचे सदस्य असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाचा किमान चार टर्म सक्रिय सदस्य असलेली आणि किमान 15 वर्षे पक्षाची सदस्य असलेली व्यक्तीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेले कोणतेही 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पात्र असलेल्या नेत्याचे नाव सुचवू शकतात. त्यासोबतच अध्यक्षाच्या नावाबाबत ज्या राज्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुका पुर्ण झाल्या आहेत अशा पाच राज्यांमधूनही अध्यक्षपदासाठी संयुक्त प्रस्ताव येणे बंधनकारक आहे.
भाजपच्या घटनेच्या कलम २१ नुसार कोणतीही व्यक्ती प्रत्येकी तीन वर्षांच्या दोन टर्मसाठीच भाजपचा अध्यक्ष राहू शकते. यापुर्वी विद्यमान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भाजपमध्ये सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष करण्यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती. पण वादात अडकल्याने गडकरी २०१३ मध्ये पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकले नाहीत.
भाजपच्या घटनेनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया अनेक महिने अगोदर सुरू होते. असे असले तरी नड्डा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यामागे ठोस कारणेही सांगितली जात आहे. यातलं सर्वात मोठं कारण म्हणजे २०२३ मध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड, तेलंगणा, त्रिपुरा, मिझोराम आणि जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर पुढच्या वर्षी म्हणजे, 2024 मध्ये एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपच्या घटनेनुसार किमान 50 टक्के राज्यांमध्ये संघटना निवडून आल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते.
त्यामुळे 2023 च्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षात कोणतेही मोठे फेरबदल न करण्याची भूमिका पक्षातील वरिष्ठांकडून घेतली जाण्याची शक्यताही आहे. त्यामुळे नड्डा यांचे पदही कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे पक्षाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून नड्डा यांची पक्षात सक्रियता खूप वाढलेली दिसत आहे. ते सातत्याने राज्यांना भेटी देत असतात.
एप्रिल-मे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ अशाच प्रकारे वाढवण्यात आला होता. त्यामुळे नड्डा यांना मिळणारी ही मुदतवाढ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तात्पुरती असली किंवा तीन वर्षांच्या पूर्ण कालावधीसाठी असली, किंवा त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड होणार असली तरी याबाबतचे चित्र सध्या तरी स्पष्ट नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.