
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा, कुटुंबियांचा थाट आता काही नवीन राहिलेला नाही. माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्याही थाटात कोणत्याही प्रकारची कमतरता आलेली नसते. पण एक काळ होता, काही नेते होते, ज्यांचे कुटुंबीय या थाटापासून दूर राहायचे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांची पत्नी असलेली महिला बसचं तिकिट काढण्यासाठी रांगेत उभी राहिलेली आहे, यावर आताच्या पिढीचा तसूभर तरी विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही, कारण अपवाद वगळता, आताच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, त्यांच्या कुटुंबीयांचा झगमगाट लोकांचे डोळे दीपवून टाकणारा असतो.
लोकशाहीत सर्वांना संधी मिळते. गरीब, श्रीमंत कुणीही लोकप्रतिनिधी, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान आदी महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या आजूबाजूलाही अशी अनेक उदाहरणे सापडतील. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलेला, उपजीविका भागवण्यासाठी वृतपत्रं विकलेला एक मुलगा पुढं चालून या राज्याचा मुख्यमंत्री बनला होता. होय, मारोतराव कन्नमवार असं त्यांचं नाव आणि बसस्थानकावर तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या त्या त्यांच्या पत्नी गोपिकाबाई! मुख्यमंत्रिपदावर असतानाच कन्नमवार यांचं निधन झालं होतं. त्यानंतरच्या महिनाभरानंतरचा तो प्रसंग!
मुख्यमंत्री, मंत्री आदी पदांवर पोहचण्याचे निकष कसे आहेत, राजकारणात किती आणि कसा बदल झाला आहे, हे आपण सर्वजण पाहात आहोत. पण एक काळ असाही होती की निव्वळ कर्तृत्व, योग्यतेच्या बळावरही नेत्यांना पद मिळत असे. कार्यकर्ते, नेते घरातून भाकरी बांधून आणून आपल्या उमेदवारांचा प्रचार करायचे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर अनेक वर्षं अशाच पद्धतीनं निवडणुका पार पडल्या. कर्तृत्वान नेत्यांना संधी मिळत गेली. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार असेच एक नेते. त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
महाराष्ट्राचा राजकीय इतिहास अत्यंत समृद्ध, संपन्न असा आहे. आपल्या तत्वांशी तडजोड न करणारे अनेक नेते, मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले आहेत. मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे त्यापैकीच एक. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असलेला, पेपर विकणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, यावर आताचे राजकारण पाहिले की कोणाचाही विश्वास बसणार नाही. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जात असताना राजकारणातील नितीमत्ता मात्र लयाला गेल्याचं चित्र आज दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या पिढीतील तत्वनिष्ठ नेत्यांचं स्मरण दिलासा देणारं ठरत आहे.
मारोतराव कन्नमवार यांचा जन्म 10 जानेवारी 1900 रोजी चंद्रपूर येथील भानापेठ येथे सांबशिव आणि गंगूबाई या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळं मारोतरावांना अर्ध्यावरच शिक्षण सोडावं लागलं होतं. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचंही शिक्षण होऊ शकलं नाही. गरीबी, अर्धवट शिक्षण या बाबी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अडथळा ठरल्या नाहीत. कोणत्याही जातीचं पाठबळ नसतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यामुळेच त्यांचा राजकीय प्रवास आश्चर्यकारक, थक्क करणारा असा आहे.
मारोतराव यांचा जन्म बेलदार या जमातीत झाला. ही जमात छोटी आहे. भटक्या विमुक्त जमातीत त्याचा समावेश होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या दादासाहेबांनी संपूर्ण विदर्भावर आपली पकड निर्माण केली होती. त्यांचं बालपण दारिद्र्याशी दोन हात करण्यातच गेलं होतं. उदरनिर्वासाठी त्यांना पेपर विकावे लागले होते. चंद्रपूर येथील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरील बाकड्यांवर त्यांनी अनेक दिवस काढले. त्यांना सातवीपर्यंतच शिक्षण घेणं शक्य झालं. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.
हिंगणघाट येथे गोपिकाबाई यांच्याशी दादासाहेबांचा विवाह झाला. गोपिकाबाई यांच्या माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पतीच्या घरी दारिद्र्य असतानाही त्यांनी जबाबदारीनं, मोठ्या हिंमतीनं संसाराचा गाडा हाकला. गोपिकाबाई यांना काही काळ नोकरीही करावी लागली होती. त्याकाळी त्यांना दरमहा 25 रुपये वेतन मिळत असे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी नोकरी करत असताना गोपिकाबाई यांनी दादासाहेबांना त्यांच्या सामाजिक कार्यातही साथ दिली. नागपूरमध्ये 1959 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष गोपिकाबाई होत्या.
हे अधिवेशन भव्य-दिव्य असं झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. अधिवेशनाची भव्यता, आयोजनातील नेटकेपणा पाहून काँग्रेस नेत्यांनी कन्नमवार यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. यामुळं दादासाहेब आणि गोपिकाबाई हे दोघेही भारावून गेले नव्हते, असं सांगितलं जातं. त्याला कारण होतं, हे कुटंब स्वबळावर, स्वतःच्या हिमतीने पुढं आलेलं होतं. गोपिकाबाईंनी काही काळ नोकरी केली होती. उदरनिर्वाहासाठी त्यांनी खाणावळही चालवली होती. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा शिरणे शक्यच नव्हते.
दादासाहेब हे 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 1957 मध्ये ते मुंबई राज्यातील सावली मतदारसंघातून निवडून गेले होते. 1962 मध्ये ते पुन्हा याच विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मुख्यमंत्रिपदावर असतानाच 24 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांचं निधन झालं होतं. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झालं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात जावं लागलं होतं. त्यामुळं दादासाहेबांना मुख्यमंत्रिपद मिळालं. मध्यप्रदेशात समाविष्ट असलेला विदर्भ प्रांत 1956 मध्ये महाराष्ट्रात आला होता.
महाराष्ट्रात समाविष्ट होताना वैदर्भीय लोकांचा अपेक्षा वाढलेल्या होत्या. विदर्भ हे वेगळं राज्य असावं, अशी शिफारस फाझल अली आयोगानं कोली होती. त्यामुळं महाराष्ट्रात येऊन आपण फसलो तर नाही ना, अशी भावना विदर्भवासियांच्या मनात निर्माण होण्याचा धोका होता. याची कल्पना काँग्रेसच्या नेत्यांना आली होती. यशवंतरावांचंही मत असंच बनलं होतं. त्यामुळंच अन्य विभागांतील दिग्गज नेत्यांना बाजूला सारून मुख्यमंत्रिपदाची माळ दादासाहेबांच्या गळ्यात टाकण्यात आली होती. अर्थात, यशवंतराव चव्हाण यांची त्याला संमती होती.
त्यावेळी दादासाहेब हे विदर्भातील श्रेष्ठ नेतृत्व होते. फाझल अली आयोगाच्या शिफारशीनुसार विदर्भ वेगळं राज्य झालं असतं तर पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान दादासाहेबांनाच मिळाल असता. पण तसं झालं नाही. दादासाहेबांनी मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडून महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय़ घेतला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहनलाल नेहरू यांनी दादासाहेबांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न केले होते. दादासाहेबांनी निष्ठा दाखवल्यामुळंच यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी त्यांची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, अशी विधानं सातत्यानं कानावर पडत असतात. दादासाहेब मुख्यमंत्री झाले, त्यावेळी हा विषय नव्हता. विकासाची मोजदाद झालेली नव्हती. विकासाचा अनुशेष भरू काढण्यापूर्वी काँग्रेसनं एकप्रकारे विदर्भाचा राजकीय अनुशेष भरून काढला होता. दादासाहेब मुख्यमंत्रिपदावर एक वर्ष राहिले. या एका वर्षात त्यांनी विकासकामं नियोजनबद्ध रितीने केली. ओझर येथे मिग विमानांचा कारखाना त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाला. वरणगाव-भंडारा आणि भद्रावती येथे संरक्षण साहित्य निर्मितीचे कारखानेही त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले.
दादासाहेब नेमस्त स्वभावाचे होते, त्यामुळं त्यांना शत्रू कमी होते. असं असलं तरी त्यांच्यार प्रचंड टीका जाली होती. गोपिकाबाईंचा संबंध सोने आणि हिऱ्यांच्या तस्करीशी जोडण्यात आला होता. या प्रकऱणाचा भांडाफोड करणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दादासाहेबांच्या विरोधात एक लॉबी सक्रिय असल्याचा हा परिणाम होता. दादासाहेबांना यशवतंरावांचा पूर्ण पाठिंबा होता, मात्र साखर लॉबी त्यांच्या विरोधात होती. अशाही परिस्थितीत त्यांनी विकासकामं सुरू ठेवली. ते उत्तम प्रसासक होते. जलसिंचनाची कामं करताना त्यांनी कोरडवाहू भागाला प्राधान्य मिळेल, याची काळजी घेतली.
त्यामुळं त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या साखरपट्ट्यातील नेत्यांशी त्यांचे खटके उडू लागले होते. मंत्रिमंडळात दोन गट तयार झाले होते. याचा दादासाहेबांवर कोणताही परिणाम झाला नाही, मात्र त्यांना लक्ष्य करणाऱ्या बातम्या सुरूच राहिल्या. त्यामुळे लोकांमध्ये दादासाहेबांबद्दल रोष निरमाण झाला होता. त्यांची टिंगलटवाळीही केली जात असे. त्यांच्यावरील आरोपांचं खंडण करण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही, त्यांना पुरेसं आयुष्य मिळालं नाही. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर वर्षभरातच दादासाहेबांचं निधन झालं होतं.
दादासाहेबांना क्रिकेटची आवड होती. लाकडं तोडून आणण्यासाठी लहानपणी ते आईसोबत जंगलात जायचे. त्या लाकडांची बॅट करून ते क्रिकेट खेळायचे. देशासाठी संरक्षण निधी जमा करण्यासाठी 17 मार्च 1963 रोजी मुंबई येथे बॉम्बे जिमखान्यावर आयोजित क्रिकेट सामन्यात दादासाहेबांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. मंत्री व महापौर संघात हा सामना झाला होता. दादासाहेबांनी मंत्री संघाचं नेतृत्व केलं. या सामन्याच्या माध्यमातून जवळपास 25 लाख रुपयांचा निधी जमा झाला होता.
दादासाहेबांचे अनेक रंजक किस्सेही आहेत. दादासाहेब देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. आवेशात भाषण करण्याची त्यांना सवय होती. ते पट्टीचे वक्ते होते. भाषण करताना ते ग्रामीण भागातील म्हणी, दैनंदिन जीवनातील उदाहरणं द्यायचे. त्यामुळं त्यांचं भाषण रंगत असे. त्यामुळे जोशात येऊन ते पुढं पुढं जायचे. त्यांना रोखण्यासाठी एक शक्कल लढवण्यात आली होती. त्यांच्या शर्टला मागच्या बाजूने दोरी बांधली जायची. ते पुढं पुढं चालले की मागून कुणीतरी ती दोरी ओढत असे. ही सूचना पंडित नेहरू यांनी केली होती, असं सांगितलं जातं.
मुख्यमंत्री बनल्यानंतरही दादासाहेब सामान्य लोकांमध्ये मिसळत असत. अशाच प्रसंगी एका शिक्षकानं आपल्या जावयाबद्दल त्यांच्याकडं तक्रार केली होती. जावई त्या शिक्षकाच्या मुलीला नांदायला नेत नव्हता. दादासाहेबांनी शिक्षकाची तक्रार ऐकून घेतली. नंतर एका कार्यक्रमानिमित्त त्यांचं त्या जावयाच्या गावी जाणं झालं. अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी जावयाला बोलावून घेतलं आणि त्याला कडक शब्दांत समज दिली होती. त्यानंतर त्या शिक्षकाच्या मुलीच्या संसाराचा गाडा रुळावर आला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला ते महत्व द्यायचे, हे यावरून दिसून येतं.
दादासाहेब मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांनी संप केला होता. जॉर्ज फर्नांडीस यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ दादासाहेबांना भेटायला गेलं होतं. मुख्यमंत्री असताना यशवंतरावांनी आमच्या मागण्या तत्वतः मान्य केल्या होत्या, आपण त्या मंजूर कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळानं केली. दादासाहेब म्हणाले होते, आता मुख्यमंत्री यशवंतराव नव्हे, तर मी आहे. त्यामुळे शिष्टमंडळ चपापलं आणि वाटाघाटी सुरू झाल्या. संप मोडित काढण्यासाठी दादासाहेबांनी हातात झाडू घेऊन कार्यकर्त्यांसह रस्त्यांची सफाई केली होती. त्यावेळी जॉर्ज यांचा मुंबईच्या कामगार संघटनांमध्ये दबदबा होता. जॉर्ज यांच्या एका हाकेवर मुंबई बंद होत असे. दादासाहेबांच्या गांधीगिरीनंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला होता.
24 नोव्हेंबर 1963 रोजी दादासाहेबांचं निधन झालं. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्याच्या महिभारानंतर दादासाहेबांच्या पत्नी नागपूरच्या बसस्थानकावर दिसल्या होत्या. ही साधी बाब नव्हती. आजच्या पिढीला ती कदाचित खरी वाटणारही नाही. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलेल्या गोपिकाबाई बसचं तिकीट काढण्यासाठी स्थानकावर रांगेत उभ्या होत्या. राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचूनही दादासाहेब आणि गोपिकाबाई यांनी व्रतस्थ जीवन जगलं होतं, हा त्याचा पुरावा होता. गोपिकाबाई यांची प्रतिमाही दादासाहेबांसारखीच स्वच्छ होती.
असं सांगितलं जातं की, कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं दादासाहेब व्यथित झाले होते. या मानहानीचा त्यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. राज्यानं एक सुसंकृत, उत्तम प्रशासक गमावला होता. त्यांच्यावरील आरोप नंतर बाजूला पडले. राजकारण्यांवर वैयक्तिक हल्ले करणे आता काही नवे राहिलेले नाही. गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2019 ते 2024 या काळात त्याची पुरेपूर प्रचीती आली आहे. वैयक्तिक हल्ले करून राजकीय नेत्यांची कारकीर्द संपवण्याची आज रूढ झालेली पद्धत दादासाहेबांच्या काळातच सुरू झाली होती. ते त्याचे बळी ठरले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.