
Maharashtra Winter Session 2023 : गेल्या वर्षी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक सरकारवर प्रचंड आक्रमक झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या अजितदादा पवारांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली होती. विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ विरोधकांना '५० खोके एकदम ओके' असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली.
कृषिमंत्री धनंजय मुंडे हातात फलक घेऊन अग्रभागी होते. २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात मात्र अजितदादा, धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबतचे आमदार त्यांनीच घोषणा दिलेल्या ५० खोकेवाल्यांच्या हातात हात घालून सत्ताधारी बाकांवर बसलेले आहेत.
गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) नागपूर येथे १९ डिसेंबर रोजी सुरू झाले होते. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरचे ते पहिलेच अधिवेशन होते. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला होता.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर '५० खोके एकदम ओके' अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केली होती. अशा घोषणा लिहिलेला फलक विरोधकांनी हाती घेतला होता. आताचे कृषिमंत्री धनंजय मुंडे तो फलक घेऊन अग्रभागी होते. (Maharashtra Assembly Winter Session 2023)
विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. ‘50 खोके एकदम ओके’, ‘कर्नाटक सरकार हाय हाय’, ‘फडणवीस सरकार हाय हाय’, ‘ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी विधान भवनचा परिसर दणाणून गेला होता.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मनीषा कायंदे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड हेही या वेळी उपस्थित होते. अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्यासह छगन भुजबळ, मनीषा कायंदे आता सत्ताधारी बाकांवर आहेत.
कर्नाटकातील मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायावरून अजितदादा पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटक सरकारला इतके का भितात, असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. त्यावेळी दोन्ही राज्यांत सीमावाद पेटला होता. कर्नाटक सरकारकडून दांडगाई सुरू होती.
सीमेलगतच्या महाराष्ट्रातील अनेक गावांवर कर्नाटकचे भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई यांनी दावा केला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सबुरीने घेण्याची सूचना केली होती.
त्यानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संयमाची भूमिका घेतली होती, तरीही कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यावरून अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले होते.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेत सामील झाला. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजितदादांनी निधी वाटपात अन्याय केला, असे एक कारण शिवसेनेतून बाहेर पडताना फुटीरांनी दिले होते. त्याच्या एक वर्षानंतर अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील होऊन पुन्हा अर्थमंत्री झाले आहेत.
आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करताना थकत नाहीत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना भारतीयांची सुटका करण्यासाठी मोदी यांनी काही वेळ युद्ध थांबवले होते, असे विधान अजितदादांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी यांनी जगभरात कॉन्टॅक्ट वाढवले आहेत, त्यातून भारताची प्रतिमा उंचावली आहे, असेही ते या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
गेल्यावर्षीचे हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे करावे, अशी मागणी अजितदादांनी माध्यमांसमोर केली होती. आता ते सत्तेत आहेत आणि अधिवेशनही तीन आठवडे चालणार नाही. सत्तेचा महिमा अगाध असतो.
गेल्यावर्षी ‘50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देणारे अजितदादा आणि त्यांचे सहकारी आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ज्या विरोधकांना अजितदादांनी गेल्यावर्षी धारेवर धरले होते, यंदा उपमुख्यमंत्री म्हणून ते त्याच सरकारच्या समर्थनार्थ किल्ला लढवताना दिसणार आहेत.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.