Rashmi Mane
12 वीत नापास झालेला मुलगा पुढे जाऊन आयपीएस अधिकारी झाला, हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट आहे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाची. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानता यश मिळवणाऱ्या अधिकाऱ्याची.
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते. लाखो विद्यार्थी स्वप्न पाहतात, पण यश काही मोजक्यांनाच मिळते. या परीक्षेसाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रचंड संयम लागतो.
उमेश गणपत 12 वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात नापास झाले. त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. अनेकांना वाटले की त्यांचे शिक्षण इथेच थांबेल. पण त्यांनी अपयशाला शेवट न मानता नवी सुरुवात केली.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे रहिवासी असलेले उमेश यांचे कुटुंब शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. घरखर्च भागवण्यासाठी ते सायकलवर दूध विकायला जायचे. लहान वयातच त्यांनी ही जबाबदारी उचलली.
नाशिकला दूध विकायला जाताना त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना पाहिले. ते दृश्य त्यांच्या मनात घर करून गेले. त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू करण्याचा निर्धार केला.
उमेश यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 2005 मध्ये 12वी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून बीए, बीएड आणि एमए पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते दिल्लीला गेले. पहिल्या दोन प्रयत्नांत 2012 आणि 2013 मध्ये त्यांना अपयश आले, पण त्यांनी खचून न जाता तयारी सुरू ठेवली.
तिसऱ्या प्रयत्नात उमेश गणपत यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी आयपीएस पद मिळवले. अपयशावर मात करून त्यांनी यशाची शिखरे गाठली.