Rashmi Mane
यंदा राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त पडल्याने शेतीचे उत्पन्न वाहून गेले आहे, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
बळीराज्यावर ‘ओला दुष्काळाचे संकट’ कोसळले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तातडीने गरज आहे.
आज झालेल्या (30 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात मिळणाऱ्या सवलती लागू करण्याची घोषणा केली आहे.
यामध्ये ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी शासनाने 2 हजार 215 कोटी रुपयांचे वाटप सुरू केले आहे. ई-KYC नियम शिथील करून अॅग्रोस्टॅकच्या नियमांनुसार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जात आहेत.
सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे येत्या 2 ते 3 दिवसांत मिळतील, त्यानंतर शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, घर, जनावरे यासाठीची मदत जाहीर केली जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा होईल, असे फडणवीसांनी सांगितले.
या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवणे आवश्यक आहे, पण एक मोठा प्रश्न आहे की राज्यातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ एक कोटी 17 लाख शेतकऱ्यांची माहिती ‘ॲग्रोस्टॅक’ प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. या शेतकऱ्यांना मदत काही मिनिटांत पोहोचवता येईल, पण...
पण उर्वरित 54 लाख शेतकऱ्यांची माहिती अॅग्रोस्टॅकमध्ये नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे कठीण ठरू शकते.
मदत वेळेत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रोस्टॅक प्रणालीत नोंदणीसाठी तातडीने प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे तात्काळ या प्रणालीत नोंदणी करावी जेणे करून आर्थिक मदत मिळण्यास अडथळा येणार नाही.