Rashmi Mane
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे उत्पन्न वाहून गेले, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आणि बळीराजावर पुन्हा एकदा ‘ओला दुष्काळाचे संकट कोसळले आहे.
शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळालेला नाही. यामागचं मोठं कारण म्हणजे नुकत्याच लागू झालेल्या ‘फार्मर आयडी’ची अट.
केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजने अंतर्गत 29 एप्रिल 2025 रोजी राज्य शासनाने जीआर काढला. त्यानुसार, 15 जुलै 2025 पासून नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
म्हणजेच, आता कोणत्याही नुकसानभरपाईच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक आहे.
पूर्वी ग्रामसेवक किंवा तलाठी पंचनामे करताना शेतकऱ्याच्या नावावरून तयार केले जायचे. मात्र आता पंचनाम्याच्या फॉर्ममध्ये शेतकरी आयडीचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला आहे.
भविष्यात जेव्हा ई-पंचनामा सुरू होईल, तेव्हाही फार्मर आयडी आवश्यक असेल. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतात, कारण अद्याप सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध नाही.
फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे, तात्काळ जवळच्या कृषी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात जाऊन फार्मर आयडीची नोंदणी करावी. आयडी मिळाल्यानंतर त्याची नोंद पंचनाम्यात करून घ्यावी.
अद्याप मदत न मिळाल्यास तालुका कृषी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा स्थानिक आमदार/जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे तक्रार नोंदवावी.