Sachin Fulpagare
खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली. ईडीने ही कारवाई केली.
खिचडी प्रकरण हे छोटे असले तरीही ते अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक दिवसांच्या चौकशा आणि त्यानंतर केलेली कारवाई आहे. पण सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले.
सूरज चव्हाण हा छोटा मासा आहे. मुख्य मासे हे अजून बाजूला आहेत. सूरज चव्हाण नावापुरता आहे. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर सर्व नावे बाहेर येतील, असा दावा शिरसाट यांनी केला.
खिचडी घोटाळ्यासह अनेक घोटाळे समोर आले आहेत. मुंबईत 26 कंत्राटदार आहेत, जे कुणाच्यातरी इशाऱ्यावर कामे घेत होते. त्याबद्दलही अहवाल आला आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
एक नाही तर अनेक प्रकरणे आता उघड होतील. त्यामुळे ही संक्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे. त्यामुळे छोटे मासे सोडून द्या. मोठ्या माशांचीही वेळ आता आली आहे, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
ठाकरे सरकारच्या काळात सुभाष देसाई उद्योगमंत्री होते. त्यावेळी काही संबंध नसताना आदित्य ठाकरे दावोसला गेले होते. त्यावेळी 30-35 हजार कोटींचे करार केले होते. पुढे त्या करारांचे काय झाले? असा सवाल शिरसाट यांनी केला.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला. पत्राचाळ प्रकरणातही सुनावणी सुरू आहे. लवकरच तुमच्यावरही कारवाई होईल, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.