Rajanand More
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील कोर्टात लाचप्रकरणी खटला दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यावरून काँग्रेसकडून सध्या दररोज संसदेच्या अधिवेशनात चर्चेची मागणी केली जात आहे.
मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून काँगेस नेते राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींवर निशाणा साधला जात आहे.
धारावी प्रकल्प तसेच लाचप्रकरणावर गौतम अदानी यांनी शनिवारी पहिल्यांदाच एका सार्वजनिक व्यासपीठावरून भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
धारावीचा प्रकल्प आपल्यासाठी केवळ झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प नसून येथील दहा लाख रहिवाशांचे जीवनमान बदलण्याची संधी असल्याचे अदानींनी म्हटले आहे.
माझ्यासाठी प्रत्येक अडथळा एक संधी आहे. आव्हानांना तोंड देण्याची ही पहिलीच वेळ नसून असा प्रत्येक हल्ला आम्हाला आणखी मजबूत करतो, असे अदानींनी अमेरिकेतील खटल्यावर भाष्य केले आहे.
आम्हाला आजवर अनेकदा अपय़श आले. अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण ती आव्हाने आम्हाला संपवू शकली नाहीत. प्रत्येकील जोमाने काम करण्याचा विश्वास या आव्हानांनी दिल्याचे अदानींनी सांगितले.
अदानी यांनी काँग्रेस किंवा राहुल गांधी यांचे नाव न घेता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, त्यांनी सूचकपणे विरोधकांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने अदानी प्रकरणाबाबत अमेरिकेकडून भारताला काहीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक आणि भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.