Jagdish Patil
राज्यात सध्या स्थानिकच्या निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने एकिकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत.
तर दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत देखील राज्यातील दोन दिग्गज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.
हे दोन्ही नेते एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचं आणि एकमेकांजवळ बसल्याचं पाहायला मिळालं.
तर राज्यातील विरोधक महायुती सरकारवर ज्यांच्या नावाने टीका करतात, ते गौतम अदानी देखील या नेत्यांसोबत एकत्र बसल्याचं दिसत आहे.
दोन प्रमुख नेते आणि उद्योगपती अदानी एकमेकांशी चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चांना उधाण आलं आहे.
तर हे नेते IPS अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांच्या लग्न समारंभासाठी उपस्थित राहिले होते.
विवाह सोहळ्यातील फोटोमध्ये पवार आणि अदानी एकाच सोफ्यावर, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खुर्चीत बसल्याचं दिसत आहेत.
पवार आणि फडणवीस हे दोघेही राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जातात. अनेकदा हे नेते राजकीय मतभेद उघडपणे व्यक्त करत असतात.
मात्र, राज्याच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे हे नेते वैयक्तिक पातळीवर एकमेकांबद्दल असणारा आदर आणि सन्मान जपत असल्याचं या फोटोत दिसत आहे.