Amit Ujagare
मऱाठवाड्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर या पट्ट्यात पावसानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
या पुरामुळं शेतातील उभी पिकं तर वाहून गेलीच आहेत, त्याचबरोबर शेतातली सुपीक माती ही वाहून गेली आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत, गुरढोरंही वाहून गेली आहेत.
या संपूर्ण परिस्थितीमुळं मराठवाडा ओला दुष्काळानं होरपळून निघाला आहे. पण तुम्हाला माहितीए का अशीच भीषण परिस्थिती मराठवाड्यानं ३२ वर्षांपूर्वी पाहिली होती.
30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावात केंद्र असलेला ६.०४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी हे भूकंपाचे तीव्र झटके बसले होते.
हा भूकंप इतका भीषण होता की, त्यात ५२ गावांमधील ३० हजार घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.
१३ जिल्ह्यांतील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसला होता.
या भीषण भूकंपात ९,७४८ माणसं मृत्यूमुखी पडली होती. तर १५,८५४ जनावरं दगावली होती. तसंच ३०,००० लोक जखमी झाले होते.
हा भूकंप झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. शरद पवारांनी भूकंपानंतर पुढील दहा दिवस लातूरमध्येच मुक्काम ठोकला होता, तिथूनच त्यांनी संपूर्ण प्रशासन कामाला लावलं होतं.
त्यानंतर भूकंपाच्या क्षेत्राचं पुनर्वसन केलं होतं. या भीषण भूकंपनानंतरच देशात आणि महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन प्रणाली उभी राहिली.