Rashmi Mane
महिलांच्या स्वावलंबनासाठी सरकारचं नवं पाऊल! ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ नंतर आता राज्य सरकारने महिलांसाठी आणखी एक उपयुक्त योजना सुरू केली आहे.
‘पिंक ई-रिक्षा योजना’. या योजनेचा उद्देश महिलांना रोजगाराच्या आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनाकडून ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
सरकारकडून वाहनाच्या किमतीवर 20 टक्के अनुदान, 70 टक्के रक्कम कर्जरूपाने बँकेकडून मिळते, तर उर्वरित 10 टक्के रक्कम लाभार्थी महिलेला स्वतः गुंतवावी लागते. कर्जाची परतफेड 5 वर्षांत म्हणजेच 60 महिन्यांत करावी लागते.
सध्या ही योजना राज्यातील 11 जिल्ह्यांत सुरू करण्यात आली आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांतील महिलांना ई-रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, वाहन परवाना, बॅच बिल्ला आणि 5 वर्षांचा विमा देण्यात येतो.
पात्रतेनुसार, लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी, वय 21 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित महिलेनं शासनाच्या इतर कोणत्याही ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि तिच्यावर बँकेचे थकबाकी कर्ज नसावे.
या योजनेतून महिलांना स्वयंरोजगाराची संधी, आर्थिक स्थैर्य, आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे. विशेष म्हणजे, शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी हा सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरणार आहे.
‘पिंक ई-रिक्षा योजना’ ही केवळ वाहन खरेदीची योजना नसून, ती महिलांना उद्योजकतेकडे वळवण्याचा आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना नवा आत्मविश्वास, स्थैर्य आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळत आहे.