Rajanand More
जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. ते राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आहेत.
आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी खासदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी ३ नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली आहे.
खासदार रुहुल्ला मेहदी यांच्या वडिलांची ३ नोव्हेंबर २००० रोजी बडगाम जिल्ह्यात आयईडी स्फोट घडवून आणत हत्या करण्यात आली होती. ते या भागात शिया नेते, धर्मगुरू म्हणून ओळखले जात होते.
राजीनाम्यासाठी हाच दिवस निवडण्यामागे त्यांनी कारणही सांगितलं आहे. वडिलांच्या हत्येनंतरच आपण राजकारणात आल्याचे ते सातत्याने सांगतात. त्यामुळे याच दिवशी राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातून कलम ३७० हटविल्यानंतर पक्षाची भूमिका मवाळ होत गेल्याचा आरोप त्यांनी पक्षनेतृत्वावर केला होता. फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांच्यावर ते उघडपणे नाराजी व्यक्त करत होते.
फारुख अब्दुल्ला यांनी त्यांना खासदाकीचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे पुन्हा निवडून येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
खासदारांनी पक्षाच्या अध्यक्षांचे हे आव्हान स्वीकारले आहे. पदाचा राजीनामा देत ते अपक्ष पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील राजकारण तापणार आहे.
रुहुल्ला मेहदी यांची खासदारकीची पहिलीच टर्म आहे. यापूर्वी ते तीनदा आमदार होते. मंत्री म्हणूनही त्यांनी अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. प्रामुख्याने बडगाम भागात त्यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे.