Rashmi Mane
2022 मध्ये भारतीय लष्करात भरती झालेल्या अग्निवीरांची पहिली तुकडी आता सेवा कालावधी पूर्ण करत आहे. त्यामुळे हजारो अग्निवीरांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
अशातच भारतीय लष्कराने कायमस्वरूपी नियुक्तीसाठी नवे मापदंड जाहीर केले आहेत.
अग्निपथ योजनेनुसार सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर केवळ 25 टक्के अग्निवीरांनाच भारतीय लष्करात कायमस्वरूपी सैनिक म्हणून संधी दिली जाणार आहे.
कायमस्वरूपी सेवेसाठी अर्ज करणाऱ्या अग्निवीरांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अग्निवीरांनी अविवाहित असणे बंधनकारक आहे.
जर एखाद्या अग्निवीराने या काळात लग्न केलं, तर तो कायमस्वरूपी नियुक्तीसाठी थेट अपात्र ठरणार आहे. नियमांची पायमल्ली केल्यास निवड प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येणार आहे.
सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लगेचच लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही. परमनंट निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लग्नाबाबत निर्णय घेता येणार आहे.
अग्निवीरांची भरती साधारणपणे 21 वर्षांपर्यंत केली जाते. 25 व्या वर्षी सेवा कालावधी संपतो. या काळात लष्कराची शिस्त, नियम आणि आचारसंहिता काटेकोरपणे पाळणं बंधनकारक असतं.
अंतिम निवड होईपर्यंत लग्न न करण्याच्या अटीमुळे अनेक अग्निवीरांपुढे वैयक्तिक आयुष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. करिअर की कुटुंब, असा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागत आहे.