Rashmi Mane
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) आता भक्तांसाठी आणखी एक मोठी सुविधा सुरू करणार आहे.
भगवान वेंकटेश्वर स्वामी यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक तिरुपतीला भेट देतात. या प्रचंड गर्दीचा विचार करून टीटीडीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित अत्याधुनिक चॅटबॉट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सेवा एकूण 13 भाषांमध्ये उपलब्ध राहणार असल्याने देशभरातील भक्तांना आपल्या भाषेत माहिती मिळू शकेल.
या नवीन चॅटबॉटच्या मदतीने मंदिर परिसरातील सर्व प्रकारच्या सेवांबाबतची माहिती फक्त एका क्लिकवर मिळणार आहे.
दर्शनाची वेळ, विविध सेवांचे बुकिंग, निवासाची उपलब्धता, अर्पण सुविधा अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन या चॅटबॉटद्वारे होईल.
विशेष म्हणजे, यात व्हॉइस-टू-टेक्स्ट सुविधा ही देण्यात येत असल्याने बोलून माहिती शोधणेही शक्य होणार आहे.
या प्रकल्पासाठी टीटीडीने ‘अमेझॉन वेब सर्व्हिसेस’ची निवड केली असून सेवेचा वार्षिक खर्च सुमारे 50 लाख रुपये येणार आहे.
तसेच या प्रणालीच्या अंमलबजावणीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सुद्धा सहभागी असणार आहे.