Rajanand More
पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघाच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अलिफा अहमद विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे त्या पहिल्यांदाच आमदार बनल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या अलिफा यांनी भाजपचे उमेदवार आशिष घोष यांचा तब्बल 50 हजार मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
अलिफा यांचे वडील नसीरुद्दीन अहमद याच मतदारसंघाचे आमदार होते. पण त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली अन् त्यांच्याच लेकीला आमदारकीची लॉटरी लागली.
38 वर्षीय अलिफा या उच्चशिक्षित आहेत. बी. टेक.ची पदवी प्राप्त केली असून राजकारणात येण्यापूर्वी त्या टीसीएस या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होत्या. पण राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली.
वडील टीएमसीचे ज्येष्ठ नेते असल्याने अलिफा यांचाही राजकारणातील वावर चांगला होता. वडिलांच्या मतदारसंघात प्रचार आणि सामाजिक कामांमध्ये त्या सक्रीय असायच्या.
आमदारकीआधी त्यांनी 2018 मध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या.
अलिफा यांचे वडील मतदारसंघात लालदा नावाने प्रसिध्द होते. आता त्यांनीही आपल्या कामाच्या माध्यमातून मतदारांवर आपली छाप पाडावी लागणार आहे. पुढीलवर्षी पुन्हा त्यांना निवडणुकीला सामोरे जायचे आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या अनेक महिला आमदार व खासदार आहेत. त्यामध्ये आता अलिफा यांचाही ममतांच्या टीममध्ये समावेश झाला आहे.