Jagdish Patil
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वृत्तपत्रांध्ये जाहिरात दिली होती. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो होता.
'बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी जिल्हाप्रमुख असलेल्या दिघेंचा फोटो शेजारी लावला, हा शिंदेंचा राष्ट्रीय कट आहे', असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला.
राऊतांच्या वक्तव्यामुळे आक्रमक झालेल्या शिंदेंच्या समर्थकांनी राऊतांचा पुतळा जाळल्यामुळे दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आनंद दिघेंवर टाडा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली ते श्रीधर खोपकर हत्या प्रकरण नेमकं काय? ते जाणून घेऊया.
20 मार्च 1989 रोजी ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी निवडणूक झाली. शिवसेनेची जबाबदारी जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि माजी महापौर सतीश प्रधानांवर होती.
बहुमत असल्यानं सेनेला जिंकण्याची खात्री होती. मात्र, निवडणुकीत सेनेचे प्रकाश परांजपे एका मताने पराभूत झाले आणि काँग्रेसचे मनोहर साळवी जिंकले.
केवळ एका मतानं परांजपे पराभूत झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे संतापले आणि गद्दार कोण? असं विचारत त्यांनी फंदफितुरी करणाऱ्यांना क्षमा करणार नाही, असं म्हटलं.
नगरसेवक श्रीधर खोपकरांनी गद्दारी करत विरोधी उमेदवाराला मत दिल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका महिन्यातच 21 एप्रिल 1989 रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली.
खोपकरांच्या हत्येला दिघेंना कारणीभूत धरलं गेलं. कारण महापालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांनी गद्दारांना धडा शिकवणार, अशी वक्तव्यं केली होती.
या हत्येप्रकरणी आनंद दिघेंवर 'टाडा'सह इतर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. हत्येचा कट रचण्याचा आरोप करण्यात आला.
नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली आणि मृत्यूपर्यंत ही केस सुरूच राहिली. मात्र, या हत्येनंतर ठाण्यात काही वाद झाला तर 'तुझा खोपकर करू का? असं म्हटलं जायचं.