Rashmi Mane
मुंबईत सध्या कबुतरखाना वाद चांगलाच गाजत आहे. दादरसारख्या भागांत "कबुतर जिंकणार की दादरकर" असा संघर्ष रंगताना दिसतो आहे. मात्र, कबुतर पालनाचे प्रस्थ नेमके कधी वाढले, याचा मागोवा घेतला तर त्याची मुळे प्राचीन इतिहासात सापडतात.
भारतात कबुतरांचा वापर प्राचीन काळापासून संदेशवहनासाठी होत होता. परंतु, मुघल काळात कबुतरपालनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
केवळ संदेशवाहक किंवा आहाराचा स्रोत नव्हे, तर मनोरंजन, सौंदर्य आणि क्रीडा म्हणूनही कबुतरांचा उपयोग होऊ लागला.
अबुल फजल यांच्या आइन-ए-अकबरी या ग्रंथात मुघल सम्राट अकबराच्या कबुतरप्रेमाचा सविस्तर उल्लेख आहे.
फरगण्याहून आणलेल्या कबुतरांसह कुशल कबुतरपालक हबीब अकबराच्या सेवेत होते. अकबराच्या दरबारात तब्बल 20,000 कबुतरे होती, त्यापैकी 500 विशेष कबुतरे होती.
अकबर छावणीत जातानाही कबुतरे सोबत नेत असे. त्यांच्यासाठी स्थलांतरयोग्य घरटी आणि त्यांची देखरेख करणारे लोकही नियुक्त केलेले होते. कबुतरांना विविध कसरतींचे प्रशिक्षण दिले जात असे.
काही कबुतरे संदेशवहनासाठी प्रशिक्षित असत, जसे की ‘रत’ कबुतर. 2002 पर्यंत ओडिशा पोलिसांच्या पिजन सर्व्हिसमध्ये कबुतरांचा वापर होत होता. ‘लोटन’ (रोलर), ‘फॅनटेल’ (जेकोबिन), ‘ट्रम्पेटर’ अशा विविध जाती मुघल दरबारात लोकप्रिय होत्या.