Jagdish Patil
बदलापुरात एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटले असून आरोपीला फाशी द्या, ही एकच मागणी नागरिकांनी लावून धरली. आंदोलनामुळे रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.
संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत शाळेची तोडफोड केली आहे. तर ही घटना घडली कशी आणि पोलिसांचा हलगर्जीपणा कसा उघडकीस आला ते जाणून घेऊया.
1 ऑगस्टला आरोपीची शाळेत नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली.
12 आणि 13 ऑगस्टला अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं.
14 ऑगस्ट रोजी पीडित मुलींपैकी एकीने तिच्या घरच्यांना प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं. पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांची मुलगीही शाळेत जायला नकार देत होती.
त्यानंतर एका खासगी डॉक्टरकडे वैद्यकीय तपासणी केली असता मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं.
पोलिसांकडे तक्रार दाखल करायला गेलेल्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवल्याचं उघडकीस येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली.