Sachin Fulpagare
अशोक चव्हाण हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते भाजपमध्ये आल्याने पक्षासाठी मोठी बाब आहे. त्यांची पत ही राष्ट्रीय स्तरावरील आहे. यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्वच त्यांच्याबाबत निर्णय घेईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
भाजपला पक्ष फोडल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली. त्याला फडणवीसांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.
माझा त्यांच्यावर उलटा आरोप आहे. त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. त्यांना पक्षातले नेते सांभाळता येत नाहीत. त्यांना पक्षाची मोट बांधता येत नाही. कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.
सगळे मोठे नेते इतक्या वर्षांची त्या पक्षातली पुण्याई सोडून भाजपमध्ये का येतायेत? याचं कारण म्हणजे काँग्रेसमधलं वातावरण, असे फडणवीस पुढे म्हणाले.
काँग्रेस पक्ष कुठल्या दिशेने चाललाय? हेच कोणाला समजत नाहीये. भाजपला विरोध करता करता देशाच्या विकासाला कधी विरोध करायला लागलो, हेही त्यांना समजत नाहीये, अशी टीका फडणवीसांनी केली.
ज्येष्ठ नेत्यांनी दृष्टीक्षेप टाकल्यावर लक्षात येतं की आपण काय करतोय, आपलं नेतृत्व काय करतंय? त्यापेक्षा देशाच्या मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे. म्हणून नेते आमच्यासोबत येत आहेत, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस नेत्यांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यांना आपलं घर का सांभाळता येत नाही. ज्यांनी काँग्रेस मोठी केली, ज्यांनी सर्वस्व काँग्रेसला दिलं, ते नेते जात आहेत. याचा विचार काँग्रेसने केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.