Deepak Kulkarni
आसाममधील प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि संगीत निर्माते सिमंता शेखर यांनी 22 सप्टेंबर 2026 रोजी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
तसेच सिमंता शेखर यांनी आसाम स्टेट फिल्म (फायनान्स अँड डेव्हलपमेंट) कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.
आसाममधील तिहू येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांनी आत्तापर्यंत लोकसंगीत, फोक फ्युजन, आसामी संगीत आणि इंडी-पॉप या प्रकारांमध्ये त्यांनी काम केले आहे.
संगीत क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीनंतर सिमंता शेखर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि भाजपशी जोडले गेले. त्यांची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचं सांगण्यात येतं.
पुढे त्यांची Assam State Film (Finance and Development) Corporationच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर ते भाजपच्या आसाम राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते.
22 सप्टेंबर 2026 रोजी सिमंता शेखर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या आसाम राज्य कार्यकारिणीतील पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण वैयक्तिक कारण असे सांगितले आहे.
महत्त्वाचं म्हणजे, सिमंता शेखर यांनी हा निर्णय भाजपच्या विचारधारा, धोरणांबद्दलची नाराजी किंवा पक्षातील कोणत्याही व्यक्तीविषयी असमाधानतेमुळे घेतला नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
सिमंता शेखर यांनी यावेळी भविष्यात आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही,तसेच कोणत्याही पक्षाशी संबंधित राहणार नसल्याचंही निवेदनातून स्पष्ट केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.