Rashmi Mane
22 जानेवारीला अयोध्येतील भव्य मंदिरात श्री रामलल्लाच्या अभिषेकाचा आणि प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रम तसेच पूजा विधी होणार आहेत. त्या कार्यक्रमांना आजपासून (16 जानेवारी) सुरूवात झाली आहे.
सर्व शास्त्रीय परंपरांचे पालन करून मुहूर्तावर अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. आज मंगळवारपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे.
दुपारी 1.30 वाजता यजमान डॉ.अनिल मिश्रा यांच्या दशविधी स्नानाने विधी सुरू होणार आहे. पुतळा उभारणीच्या ठिकाणी कर्मकुटीचे पूजन तसेच विवेक सृष्टी येथे हवन होणार आहे. अयोध्येतील शरयूच्या तीरावर विष्णूपूजा आणि गाय दान होणार आहे.
17 जानेवारीला रामलल्लाची मूर्ती आवारात प्रवेश करणार आहे. या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाला ओढ लागली असलेल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही दिवस उरले आहेत.
गुरुवारपासून (दि 18) मूर्तीचा अभिषेक विधी सुरू केला जाईल. या सोबतच मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा देखील गुरुवारी केली जाणार आहे.
शुक्रवारी (दि 19) राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. तर शनिवारी (दि २०) राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे.
मंदिरात वास्तु शांती केली जाणार आहे. रविवारी (दि 21)ला रामलल्लालाच्या मूर्तीला 125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येणार आहे.
सोमवारी 22 तारखेला मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा करण्यात येणार असून 12.29 ते 12.30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.