Rashmi Mane
देशात वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. हा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली.
सरकारनं योजनेत महत्त्वाचा बदल केला असून आता काही पात्र कुटुंबांना 5 ऐवजी 10 लाखांपर्यंतचे आरोग्य कवच मिळणार आहे. यामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना वैद्यकीय खर्चापासून संरक्षण देते. गंभीर आजारांवर उपचार करताना पहिल्या दिवसापासून कॅशलेस सेवा मिळते.
या योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे ‘कुटुंब’ हा शब्द विस्तृत आहे. यात पती-पत्नी, मुलं, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहिण यांचा समावेश होतो. कुटुंबातील सदस्यसंख्येवर किंवा वयावर कोणतीही मर्यादा नाही.
मूळ योजनेत प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचे विमा संरक्षण मिळते. पण आता कुटुंबातील एखादा सदस्य 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्यास अतिरिक्त 5 लाखांचे कव्हरेज देण्यात येत आहे.
70 वर्षांवरील नागरिकांसाठी हे स्वतंत्र कव्हर आधार कार्डवर नोंदलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे एकूण कव्हरेज 10 लाखांपर्यंत वाढते आणि कुटुंबाला मोठी आर्थिक मदत होते.
ही योजना देशभरातील हजारो रुग्णालयांत कॅशलेस व पेपरलेस उपचार उपलब्ध करून देते. महागडी शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या सर्व गोष्टी व्यवहाराशिवाय मिळू शकतात.
महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजना देखील आयुष्मान भारत योजनेशी संलग्न करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना अधिक विस्तृत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत.