Vijaykumar Dudhale
विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील बाभूळगावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय इनिंगची सुरुवात केली होती.
देशमुख यांनी धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्हा परिषदेचे सदस्य आणि लातूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम पाहिले आहे.
विलासराव देशमुख हे 1980 मध्ये प्रथम आमदार झाले. तेव्हापासून 1995 पर्यंत ते विधानसभेचे सदस्य होते. पण, 1995 च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 35 हजार मतांच्या फरकांनी पराभव झाला आणि त्यांच्या राजकीय इनिंगला काहींसा ब्रेक लागला.
विधानसभेत पराभूत झाल्यानंतर 1996 मध्ये त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविण्याचे ठरविले. पण, काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. विलासराव देशमुखांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत देशमुख यांनी शिवसेनेकडे मदतीची मागणी केली. मात्र, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेना प्रवेशाची अट ठेवली होती. विलासराव देशमुखांनी ती ऑफर नाकारली. पण, पुढे ठाकरेंनी विलासराव देशमुखांना पाठिंबा जाहीर केला.
विलासराव देशमुख यांची लढत त्यावेळी एक्साईजचे माजी अधिकारी लालसिंग राठोड यांच्याशी झाली होती. शिवसेनेचा पाठिंबा असूनही विलासरावांचा अवघ्या अर्ध्या मताने पराभव झाला. पराभवानंतरही देशमुख यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले.
लातूर मतदारसंघातून 1999 मध्ये विलासराव देशमुख हे विधानसभेवर पुन्हा निवडून आले. 18 ऑक्टोबर 1999 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते 17 जानेवारी 2003 पर्यंत मुख्यमंत्री होते.
विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. एक नोव्हेंबर 2004 रोजी ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्या पदावर ते 4 डिसेंबर 2008 पर्यंत होते.
काका-पुतण्यावरून जयंत पाटील अन् नाना पटोलेंच्यात टोलेबाजी