Jagdish Patil
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया (80) यांचं आज सकाळी निधन झालं. त्या शेख हसीना यांच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होत्या.
जिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांनी सोमवारी (ता.२९) तेराव्या संसदीय निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता, पतीच्या हत्येनंतर अनेक आव्हानं पार करून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं.
खालिदा जिया यांचा विवाह बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष जिया-उर-रहमान यांच्याशी झाला होता.
मात्र, 1981 मध्ये एका लष्करी बंडादरम्यान त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली. पतीच्या निधनानंतर त्या सक्रिय राजकारणात आल्या.
त्यांना 1983 ते 1990 या काळात 7 वेळा अटक झाली. त्यांनी 1986 च्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला.
9 वर्षांच्या संघर्षानंतर 1991 मध्ये त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांच्याच कार्यकाळात बांगलादेशात संसदीय व्यवस्था लागू करण्यात आली.
खालिदा जिया यांचा जन्म 1945 साली सध्याच्या पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात झाला होता.
बंगालच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिनाजपुरला स्थलांतरित झाले, जो भाग पुढे पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेश बनला. त्यामुळे त्यांनी 3 देशांचे नागरिकत्व अनुभवले होते.