Rajanand More
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पत्नी मिशेल ओबामा हे जोडपं सध्या चर्चेत आहे. त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
मागील काही महिन्यांत बराक ओबामा हे अनेक सरकारी कार्यक्रमांमध्ये एकटेच दिसतात. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीलाही ते एकटेच उपस्थित होते.
ओबामा दाम्पत्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याने मिशेल या बराक ओबामा यांच्यासोबत दिसत नसल्याच्या चर्चेने जोर धरला. दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या.
मिशेल यांनी या चर्चांवर नुकताच खुलासा केला आहे. सोफिया बुश यांच्या ‘वर्क इन प्रोग्रेस’ या पॉडकास्टमध्ये त्यांनी घटस्फोटाच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
मी माझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे, तेच निवडल्याचे मिशेल यांनी म्हटले आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा स्वीकार न करण्याची सवय असल्याने लोकांमध्ये माझ्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे मिशेल यांनी स्पष्ट केले आहे. नात्यामध्ये दुरावा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बराक आणि मिशेल ओबामा यांचे 1991 मध्ये लग्न झाले. त्यांना साशा आणि मालिया या दोन मुली आहेत.
शिकागोतील एका लॉ फर्ममध्ये काम करताना मिशेल यांची बराक यांच्यासोबत पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढत गेली.