Rashmi Mane
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रवेशाच्या वेळी एकदाच उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षणकाळात व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
हा निर्णय नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत शिष्यवृत्ती वितरणातील अडचणी कमी करण्याबाबत चर्चा झाली.
शैक्षणिक शुल्क भरणे किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी वारंवार उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही.
शिष्यवृत्ती अर्जांची छाननी करताना वेळ वाचेल. प्रवेशित विद्यार्थ्यांचा अचूक आणि अद्ययावत डेटा उपलब्ध राहील. विद्यापीठांना कागदपत्रे वारंवार तपासावी लागणार नाहीत.
विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी तीच माहिती देण्याचा त्रास टळेल. शिष्यवृत्ती मिळण्याच्या टप्प्यांची संख्या कमी होईल आणि प्रक्रिया जलद होईल.
या निर्णयामुळे वेळ, श्रम आणि अडचणी कमी होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला वेग मिळणार आहे.