Rashmi Mane
देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये आर्थिक मदत देते.
ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यांमध्ये, म्हणजे दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या स्वरूपात दिली जाते. आतापर्यंत 20 हप्ते वितरित झाले असून, शेतकरी आता 21 व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र काही तांत्रिक आणि पडताळणी प्रक्रियेमुळे रक्कम थोडी उशिरा मिळणार आहे. दरम्यान, सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता दुप्पट रक्कम म्हणजेच 4,000 रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.
त्यांचे कारण म्हणजे ज्यांना मागचा 20 वा हप्ता मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी थेट दोन हप्ते म्हणजेच 4,000 रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.
गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांना तात्पुरते योजनेतून बाद करण्यात आले होते.
परंतु, ज्यांनी आपली सर्व कागदपत्रे जसे की जमिनीचे रेकॉर्ड, आधार आणि बँक खाते योग्य पद्धतीने अपडेट केली आहेत, त्या शेतकऱ्यांना यावेळी एकत्र दोन हप्ते मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होऊ शकतो. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.