Rajanand More
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या लव्हस्टोरीने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
तेजप्रताप यांनी शनिवारी (ता. 24) सोशल मीडियात एक पोस्ट केली होती. अनुष्का यादव या तरूणीसोबत आपण 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले होते. दोघांचा एक फोटोही पोस्ट केला होता.
काही वेळाने त्यांनीच ही पोस्ट डिलिट करत आपले अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. दोघांचा फोटो एआयच्या माध्यमातून तयार केला असावा, असेही त्यांनी म्हटले होते.
अनुष्का यादव ही राष्ट्रीय जनता दलातील एका माजी पदाधिकाऱ्याची बहीण असल्याची चर्चा आहे. सध्या हा पदाधिकारी कोणत्याच पक्षात नाही.
तेजप्रताप आणि अनुष्का या दोघांच्या विवाहाचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तसेच दोघांचे इतर काही व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत.
तेजप्रताप यांचा यापूर्वीच 2018 मध्ये विवाह झाला आहे. माजी मुख्यमंत्र्यांची नात ऐश्वर्या राय या त्यांच्या पत्नी आहेत. दोघांमध्ये काही महिन्यांतच वाद सुरू झाला आणि सध्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.
रिलेशनशिपचा प्रकार समोर आल्यानंतर बिहारमध्ये मोठे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. अद्याप पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला नसताना तेजप्रताप यांच्या या कृतीने वाद निर्माण झाला आहे.
वडील लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. तसेच कुटुंबातूनही त्यांना हद्दपार करण्यात आल्याचे लालूंनी स्पष्ट केले आहे.