सरकारनामा ब्यूरो
आदिवासींचे महान स्वातंत्र्यसैनिक, भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती यानिमित्त त्यांच संघर्षमय जीवन जाणून घेऊया.
भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर, 1875 रोजी झारखंडमधील उलिहातू या गावी मुंडा जमातीत झाला होता. त्यांना "भगवान" तसेच धरती आबा म्हणजेच पृथ्वीचा पिता म्हणूनही ओळखले जाते.
बिरसा मुंडा यांनी आदिवासी समुदायाला ब्रिटिशांविरुद्ध शोषणकारी धोरणांविरुद्ध आणि सक्तीच्या मजुरीच्या सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध संघटित केले.
बिरसा मुंडा यांनी उलगुलान या उठावाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा सर्व स्तरांवर बदलासाठी लढा दिला. दारू सोडण्यास, गावे स्वच्छ ठेवण्यास, अंधश्रद्धा आणि मिशनरी प्रभाव झुगारून देण्यास प्रवृत्त केलं.
आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांचे रक्षण करणारे कायदे आणण्यास भाग पाडले. त्यांनी ब्रिटीश मिशनरी आणि त्यांच्या अन्यायकारक कारवायांविरुद्ध एक मोठी चळवळ उभी केली.
ही चळवळ केवळ धार्मिक नव्हती, तर ती आदिवासी स्वाभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा होती. "जमीन आमची, जंगल आमचं, देव आमचा" हा तिचा गाभा होता.
बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचे आणि विचारांचे प्रतिबिंब २००६ च्या वन हक्क कायद्यात स्पष्टपणे दिसते. या कायद्याने आदिवासींचे वडिलोपार्जित जमिनीवरील हक्क मान्य केले, जे बिरसांच्या महत्वकांक्षी लढ्याचे एक मोठे यश मानले जाते.
बिरसा मुंडा यांनी अवघ्या २५ वर्षाच्या जीवनकाळात आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी काळाच्या पुढे जाऊन अनेक विचार मांडले.