Aslam Shanedivan
जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे.
विहित मुदतीत नोंदणी न केल्यास भविष्यात अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
यामुळे जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे याची नोंदणी करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे
तसेच याबाबत शासन निर्णय आणि जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ नुसार नोंदणी न केल्यास विलंब शुल्क किंवा दंडाचा भुर्दंड सोसावा लागेल असाही इशारा देण्यात आला आहे
जन्म नोंदणी ही शाळा प्रवेशासाठी अधिकृत पुरावा असून तो आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काढण्यासह शासकीय योजना, शिष्यवृत्ती व वयाचा अधिकृत पुरावा मानला जातो.
मृत्यू नोंदणी ही वारसाहक्क निश्चित करणे, मालमत्तेचे हस्तांतरण, पेन्शन, विमा दावे आणि बँक खाती बंद किंवा हस्तांतरित करण्यासाठी तसेच शासकीय नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक असते.
दुर्लक्षामुळे नोंदणी करण्यास उशीर झाल्यास अतिरिक्त दंड भरण्यासोबतच पोलीस चौकशी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो.
ही कटकट टाळण्यासाठी जन्म किंवा मृत्यूची घटना घडताच संबंधित नगरपरिषद, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय किंवा अधिकृत नोंदणी केंद्रात जावून जन्म-मृत्यूची नोंद वेळेतच करावी