Rajanand More
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बीट्टू बॉस’ नावाच्या बिबट्याचा २१ मार्च २०२६ रोजी मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून हा बिबट्या आजारी होता.
शिवसेनेचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबाशी ‘बीट्टू बॉस’चे खास नाते होते. या बिबट्याला त्यांनी दत्तक घेतले होते.
प्रताप सरनाईक यांचे पुत्र व युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपला भावना व्यक्त केल्या आहेत.
आज आपल्या सर्वांचा लाडका, आपला दत्तक घेतलेला बाळ… “Bittu Boss” आपल्याला सोडून गेला. तो फक्त एक प्राणी नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा एक भाग होता, असे पुर्वेश यांनी म्हटले आहे.
‘बीट्टू बॉस’च्या आठवणी, त्याची निरागसता आणि आपुलकी सदैव आपल्या मनात जिवंत राहतील. Bittu Boss, तुझ्या आत्म्यास शांती लाभो, असे पुर्वेश यांनी म्हटले आहे.
ठाण्याच्या येऊर जंगल परिसरात डिसेंबर २०१९ मध्ये नगरसेवक परिषा सरनाईक 'मॉर्निंग वॉक' करताना त्यांना व इतरांना हा बिबट्याचा बछडा दिसून आला होता. त्यावेळी वन विभागाने या बछड्याला ताब्यात घेतले होते.
बछड्याला पुन्हा जंगलात सोडले, पण त्याच्या आईची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात सांभाळ करण्यासाठी आणले.
सरनाईक कुटुंबाने तेव्हापासून या बछड्याला दत्तक घेतले होते. बीट्टू बॉस हे नाव त्यांनीच या बछड्याला दिले होते. पण मागील काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकारामुळे बिबट्या त्रस्त होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला.