Amol Sutar
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून त्यात 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तर चार वादग्रस्त नेत्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. त्यांनी एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचे वर्णन रावण आणि कंस असे केले होते.
तसेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांना शहीद म्हटले होते. यावरुनही बराच वाद झाला होता.
दक्षिण दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्याबाबत संसदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले.
चंद्रयान-3 मिशनच्या चर्चेदरम्यान बिधुरी यांनी दानिश यांच्याविरोधात अपशब्द वापरले. त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खेद व्यक्त केला होता, तर भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार परवेश वर्मा यांचेही तिकीट पक्षाने कापले. गेल्या वर्षी त्यांनी एका विशिष्ट समुदायावर 'आर्थिक बहिष्कार' घालण्याची मागणी केली होती.
गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी पूर्व दिल्लीतील विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक युनिट आणि इतर हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या 'विराट हिंदू सभा' या बैठकीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते.
भाजपने हजारीबाग लोकसभा मतदारसंघातील जयंत सिन्हा यांना उमेदवारी नाकारली आहे. यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी ट्विट केले होते की, मला निवडणुकीतील जबाबदारीतून स्वातंत्र्य हवे आहे.
झारखंडमधील रामगढ येथील एका मांस व्यापाऱ्याच्या लिंचिंगप्रकरणी मी आणि भाजपच्या इतर काही नेत्यांनी आरोपींचे कायदेशीर शुल्क भरले होते, असे सांगितल्याने ते वादात सापडले होते. आरोपी जामिनावर बाहेर आले तेव्हा ते त्यांचे स्वागत करताना दिसले.