Ganesh Sonawane
पार्टी विथ डिफरन्स असे भारतीय जनता पक्षाविषयी बोलले जाते.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिवसभरात केलेली कामे व प्रस्तावित कामांचा लेखाजोखा आता सरल आणि नमो अॅपच्या माध्यमातून दररोज मांडावा लागत आहे.
त्यामुळे दररोजचा केआरए पदाधिकाऱ्यांना पूर्ण करावा लागत आहे. त्यासाठी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांपासून भाजप मंडल अध्यक्षांना पक्षाकडून टॅब पुरविण्यात आले आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्याकडून दिवसभरात होत असलेल्या कामगिरीचा आढावा श्रेष्ठींकडून घेतला जात आहे.
त्याचबरोबर केंद्रीय आणि प्रदेश कार्यालयाकडून विविध स्वरूपाचे कार्यक्रम देऊन त्यांची पूर्तता करून घेण्याबाबतही कामांचे वाटप केले जात आहे.
पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही पावले उचलली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कॉर्पोरेट कल्चरप्रमाणे भाजपकडून आपल्या पदाधिकाऱ्यांना केआरए दिले जात असून, निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची दक्षता पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.
पदाधिकाऱ्यांना सरल व नमो अॅपच्या माध्यमातून दिवसभर केलेल्या कामांची माहिती टॅबद्वारे सादर करावी लागते.
एखाद्या दिवशी कामाची माहिती सादर केली नाही, तर त्याबाबत केंद्रीय कार्यालयाकडून विचारणा केले जात असल्याचे पदाधिकारी सांगतात.